महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 2, 2020, 4:13 PM IST

ETV Bharat / city

'त्या' 272 घरांच्या लॉटरीसाठी म्हाडाकडून 'तारीख पे तारीख'; उद्याची तारीख पुढे ढकलली

मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना 29 ऑक्टोबरला वेळ नसल्याने, घाई गडबडीत लॉटरी घेणे शक्य नसल्याने लॉटरी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले गेले. तर आता मात्र मंडळाकडून लॉटरी रद्द करण्याचे कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही. वरिष्ठांकडूनही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र म्हाडाकडून काढण्यात आलेल्या पत्रात काही अपरिहार्य कारणामुळे लॉटरी पुढे ढकलण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Mhada
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प

मुंबई - ना.म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील प्रस्तावित पुनर्वसित इमारतीतील 272 घरांसाठी उद्या 3 नोव्हेंबरला ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र, आता उद्याची लॉटरी रद्द करत तारीख पुढे ढकलली आहे. याआधी 29 ऑक्टोबरला लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र, ती रद्द करत 3 नोव्हेंबरचा नवा मुहूर्त लॉटरीसाठी जाहीर करण्यात आला. मात्र आता हा मुहूर्त सुद्धा रद्द करत दोनदा लॉटरी पुढे ढकलली आहे.

वरळी, ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव अशा तीन ठिकाणच्या चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सद्या वरळी आणि ना. म. जोशी चाळीचाच पुनर्विकास सुरू असून नायगावचा पुनर्विकास ठप्प झाला आहे. कंत्राटदार एल अँड टीने प्रकल्पातून माघार घेतल्याने प्रकल्प रखडला आहे. दरम्यान एल अँड टीने बीडीडीतून माघार घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम 'ईटीव्ही भारत'ने प्रसिध्द केले होते. आता नायगावचा प्रकल्प थांबला असला तरी वरळी आणि ना. म. जोशी मार्ग प्रकल्पाला वेग देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार प्रस्तावित पुनर्वसित इमारतीतील 272 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

कॅबिनेट बैठकीमुळे याआधी लॉटरी रद्द

या निर्णयानुसार ऑक्टोबरमध्ये लॉटरी काढण्याची तयारी सुरू करण्यात आली. ऑनलाइन पध्दतीने ही लॉटरी काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. तर 29 ऑक्टोबर अशी लॉटरीची तारीख निश्चित करण्यात आली. पण लॉटरीच्या एक दिवस आधी राज्य मंत्रिमंडळाची बैठकी 29 ऑक्टोबरलाच लावण्यात आली. त्यामुळे यादिवशी घाई गडबडीत लॉटरी नको असे म्हणत मंडळाने लॉटरी 3 नोव्हेंबरला घेण्याचा निर्णय घेतला.

'ते' 272 रहिवासी नाराज

ना.म.जोशी मार्ग प्रकल्पातील 272 पात्र रहिवासी म्हाडाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित झाले आहेत. या रहिवाशांना घराची हमी देण्यासाठी पुनर्वसित इमारतीचे बांधकाम होण्याआधीच लॉटरी काढत त्यांना कुठे, कोणत्या मजल्यावर, कोणत्या इमारतीत घर मिळणार हे निश्चित करण्यात येणार आहे. तर या रहिवाशांशी तसा करार करत त्यांना घराची हमी देण्यात येणार आहे. त्यामुळे ही लॉटरी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण आता दोनदा लॉटरी रद्द केल्याने हे 272 रहिवासी नाराज झाले आहेत. मुंबई मंडळाने कोणतेही ठोस कारण न देता लॉटरी रद्द केली आहे. तेव्हा मंडळ लॉटरीबाबत गंभीर आहेत का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे आता दोन दिवसांत आम्ही बैठक घेत पुढे काय करायचे याचा निर्णय घेणार आहोत. तर आम्ही नक्कीच याचा जाब म्हाडाला विचारणार आहोत, असे कृष्णकांत नलगे, रहिवासी यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details