मुंबई - रुग्णसंख्या वाढत असल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत अंशतः लॉकडाऊन करावा लागेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे मुंबई लवकरच लॉकडाऊन लागणार हे आता निश्चित झाले आहे.
मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने लॉकडाऊन करावा लागेल -
मुंबईत मागील वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. जुलैपर्यंत कमी झालेला कोरोना ऑगस्टमध्ये पुन्हा वाढू लागला. डिसेंबर जानेवारी दरम्यान पुन्हा रुग्णसंख्या कमी झाली. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने धार्मिक स्थळे, बाजारपेठा, यांवर निर्बंध आणणे आवश्यक आहे. रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन करावा लागेल, असे संकेत महापौरांनी दिले आहेत. मात्र याबाबत प्रशासनाशी चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही महापौरांनी म्हटले आहे.
गर्दीवर नियंत्रण आवश्यक -
झोपडपट्ट्यात कोरोना पसरण्याची जास्त भीती होती. झोपडपट्ट्यांमधील कोरोना रोखण्यात पालिकेला यश आले आहे. झोपडपट्टीपेक्षा इमारतींमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. सद्या वाढणारा कोरोनाचा संसर्ग उच्चभ्रु वस्त्यांमध्ये अधिक आहे. हा प्रसार वेगाने होतोय, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले.