महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 11, 2021, 10:15 PM IST

ETV Bharat / city

LOCKDOWN : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्सनंतर सचिवांसोबत बैठक, सर्वसमावेशक 'एसओपी' तयार करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत कोरोना संकटावर बैठक पार घेतली. यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ठाकरेंनी सदस्यांची मते जाणून घेत लगेचच राज्याच्या सचिवांसोबत बैठक घेतली. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार हे अटळ समजले जातआहे.

lockdown preparation begins
lockdown preparation begins

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना टास्क फोर्ससोबत कोरोना संकटावर बैठक पार घेतली. यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ठाकरेंनी सदस्यांची मते जाणून घेत लगेचच राज्याच्या सचिवांसोबत बैठक घेतली. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार हे अटळ आहे.


कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी, असे सांगताना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा, अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता,रेमडेसिवीर वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी. डॉ अविनाश सुपे, डॉ उडवाडिया, डॉ वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ झहीर विराणी, डॉ ओम श्रीवास्तव, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

एसओपी तयार करण्याचे काम सुरू -

गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल.

आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊत पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपयुक्त ठरेल, आत्ता या क्षणी असलेल्या लाटेला थांबविण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

रेमडेसिवीरचा अवाजवी वापर थांबिण्यावर चर्चा -

आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे, असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी देखील बोलताना पण रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडेसिवीरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली.

टास्क फोर्सने दिल्या सूचना -

९५ टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी, सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी, मुंबई पालीकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत, तरुण रुग्णांना देखील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे, ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सुचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे आदि सुचना करण्यात आल्या

ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न -

प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १२०० मेट्रिक टन पैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरु आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details