मुंबई - आपत्ती व्यवस्थापन आता लोकल प्रवासासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच पास देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागातील (मुंबई, ठाणे, पालघर व रायगड) जिल्ह्यातील शिक्षकांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश द्या, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.
'शिक्षकांवर आर्थिक भार'
इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम करण्यासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास नाकारल्याने, स्वखर्चाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शिक्षकांना प्रवासाची मुभा देण्याची घोषणा करून सरकारने शिक्षकांची फसवणूक केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुंबईतील शाळांमधील ठाणे, पालघर, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात निवास करणाऱ्या शिक्षकांनी खाजगी गाड्यांनी प्रवास केला. ठाणे पालघर व नवी मुंबईतील शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्यांना लोकल प्रवासाशिवाय पर्याय नाही. या जिल्ह्यांतर्गत काम करणारे शिक्षकही स्वखर्चाने प्रवास करीत आहेत. त्यासाठी त्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
'अन्य शिक्षकांना वर्क फ्रॉम होम द्या'
लोकलमध्ये दहावीच्या मूल्यमापन करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांना परवानगी दिली असली, तरी ती किचकट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षण उपसंचालकांकडून नावे येणार, मग रेल्वे पास ऑनलाइन एसएमएसच्या माध्यमातून रेल्वे वितरीत करणार, या प्रक्रियेस अनेक दिवस लागतात. यापेक्षा शाळेच्या ओळखपत्रावर पास देण्यात यावा. याबाबद अनेकदा मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून या मागणीवर दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता शिक्षकांना ऑनलाइन अध्यापनासाठी 'वर्क फ्रॉम होम' करू देण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे.