मुंबई - मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक तब्बल एक तास विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून अनेक प्रवाशांना रेल्वे रुळावरून चालत जावे लागले आहे.
वांगणी रेल्वे स्थानकावर लोकल ब्रेक जाम; तब्बल एक तास लोकल सेवा ठप्प - मुंबईत लोकल सेवा एक तास ठप्प
मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक तब्बल एक तास विस्कळीत झाली.
तब्बल 60 मिनिटे लोकल सेवा ठप्प -
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनचा ब्रेक जाम झाल्यामुळे खबरदारी म्हणून ती गाडी वांगणी स्थानकात थांबविण्यात आली होती. ही घटना सकाळी ११ वाजून १५ मिनिटांची आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी पोहचले. तब्बल एक तासानंतर १२ वाजून १५ मिनिटांनी हा बिघाड दुरुस्त करून लोकलला मार्गस्थ करण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे डाऊन मार्गावरील लोकल गाड्या जागीच खोळंबल्या होत्या. परिणामी लोकलच्या एकामागे एक रांगा लागल्या. लोकलच्या खोळंब्यामुळे काही प्रवाशांना लोकलमधून उतरून रेल्वे रुळावरून मार्ग काढावा लागला. त्यामुळे प्रवाशांचे सुद्धा प्रचंड हाल झाले आहेत.