मुंबई -सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने ( Maharashtra State Election Commission ) आपला निवडणुकीचा कार्यक्रम आखला असून त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या ( Local Body Elections 2022 ) प्रभाग रचना बाबत आढावा बैठका सुरू आहेत. तर आता राज्यातील विविध २१६ नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर काम सुरू करण्यात आले आहे. ११ मार्च २०२२ रोजी थांबवण्यात आलेले काम आता पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिली.
नगरपरिषदांच्या हरकती आणि सूचना -राज्यातील २१६ नगरपरिषदा नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १० ते १४ मे २०२२ दरम्यान हरकती आणि सूचना मागवण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू करावी. जिथे काम थांबले होते तिथून पुढे सुरू करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने चार मे रोजी दिल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे. यात २०८ नगरपरिषदा आणि ८ नगरपंचायतींचा समावेश आहे. १० ते १४ मे २०२२ दरम्यान याबाबत हरकती आणि सूचना दाखल करण्यात करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी २३ मे २०२२ पर्यंत सुनावणी घेणार आहेत. प्रभाग रचनेचे पाठ प्रारूप १० मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या आणि आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांचे एकत्रित सुनावणी करण्यात येणार असल्याचेही सणस यांनी सांगितले.