मुंबई - राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या कलम 353 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Rana Couple Judicial Custody : नवनीत यांची भायखळा तर रवी राणा यांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी; आणखी एक गुन्हा दाखल - Mumbai politics
16:45 April 24
आणखी एक गुन्हा दाखल
15:15 April 24
सहा शिवसैनिकांना अटक
खार पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली आहे. राणा दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तर इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
14:53 April 24
राणांविरोधात नागपुरात तक्रार
नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अपशब्द वापरल्या प्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा विरोधात नागपुरच्या शिवसैनिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राणा दाम्पत्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अपशब्द वापरले होते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जाऊन शिवसेनेला आवाहन देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी नागपुरात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
14:47 April 24
अमरावतीत होमहवन
अमरावती - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अमरावती येथील शंकर नगर स्थित निवासस्थानी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी होमहवन केले. विशेष म्हणजे हनुमानाच्या फोटो सोबत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही पूजेत लावला. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी ही पूजा केली जात असल्याचे युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
14:29 April 24
आता तुरूंगात हनुमान चालीसा पठन करावा - संजय राऊत
लोकप्रतिनिधी हे जर राज्यांविरोधात कारस्थान करत असेल तर त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. राज्य उलथवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदावर्ते प्रकरणातही तेच झाले. शरद पवारांच्या घरावर चाल करुन जाण्यात आले. मात्र राज्य सरकार यांचे कट उधळून लावणार असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. हिंदूंच्या कोणत्याही कार्यक्रमांना, हनुमान चालिसा पठणाला कुठेही विरोध नाही. मात्र मातोश्रीत घुसून वाचीन हा हट्ट कशासाठी? असा सवाल राऊत यांनी केला आहे. नवीनत राणा यांनी जातीचे बोगस प्रमाणपत्र तयार करुन निवडणूक लढवली आहे. त्यांनी संविधानाची, अमरावतीतील नागरिकांची फसवणूक केली आहे. संसदेत जयश्रीरामच्या नावाला यांनी विरोध केला आहे. हे तपासून पाहावे, असेही राऊत म्हणाले. हनुमान चालीसा देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन वाचावा. आता त्यांची तुरुंगात रवानगी झाली आहे, त्यांनी तिथे पठण करावे.
14:14 April 24
राणांनी उच्चारलेला एकही शब्द दाखवला नाही - राणांचे वकील
प्रथमच, सरकारी वकील प्रदिप घरत, साहजिकच पोलिस विभागाच्या सूचनेनुसार, आरोपीचा खटला 124A अंतर्गत येतो, जो देशद्रोह आहे असा युक्तिवाद केला. त्यांना (सरकारी वकील प्रदिप घरत) राणा दाम्पत्याने कथितपणे उच्चारलेला एक शब्दही दाखवता आला नाही. रिमांड अर्जातील मजकूर एवढाच होता की त्यांनी हनुमान चालिसा पठणाच्या उद्देशाने येथे येण्याची तयारी केली होती, असे राणांचे म्हणाले
14:10 April 24
राजद्रोहाचा गुन्हा दाखल
खार पोलिसांनी नवनीत आणि रवी राणा यांच्या तक्रारीवरून दुसऱ्या बाजूने एफआयआर नोंदवल्यानंतर, पोलिसांनी नवनीत कौर राणा आणि तिचा पती रवी राणा यांच्याविरुद्ध 353 आयपीसीचा गुन्हा दाखल केला. जर निवासस्थानावरील घटनेच्या संदर्भात 353 आयपीसीचा आरोप लावला गेला असेल तर एफआयआरमध्ये तो आरोप का जोडला गेला नसता असे कोणतेही कारण नाही, असे राणा यांचे वकिल रिझवान रिचर्ड यांनी सांगितले.
13:51 April 24
नवनीत राणा भायखळा तर रवी राणा यांची आर्थर रोड तुरुंगात होणार रवानगी
मुंबई - खासदार नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे, तर आमदार रवी राणा यांचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात राहाणार आहे.
13:40 April 24
सहा शिवसैनिकांना अटक
मुंबई - खार पोलिसांनी सहा शिवसैनिकांना अटक केली आहे. राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केल्या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. राणा दाम्पत्याने अज्ञात शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
13:33 April 24
जामीनावर 29 एप्रिलला सुनावणी
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वांद्रे न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला. त्यावर 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तुरूंगात त्यांचा मुक्काम असणार आहे.
13:30 April 24
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
वांद्रे न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकला. त्यानंतर राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता त्यांना जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
13:17 April 24
पोलीस कोठडीची मागणी
वांद्रे न्यायालयात सुनावणीस सुरूवात झाली आहे. पोलिसांनी राणा यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. तर राणा दाम्पत्याची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद राणा यांच्या वकिलांनी केला आहे.
12:12 April 24
सुनावणीला सुरूवात
राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर कोर्टात सुनावणीस सुरूवात झाली आहे. रिझवान मर्चट हे राणा यांची बाजू मांडत आहे. तर अॅड. प्रदीप घरत हे सरकारकडून युक्तिवाद करत आहे. राणा दाम्पत्यावर कलम 153 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
11:06 April 24
राणा दाम्पत्य कोर्टात पोहोचले
सांताक्रुझ पोलीस राणा दाम्पत्याला घेऊन वांद्रे न्यायालयात पोहोचली आहे. थोड्याच वेळात कोर्टरूममध्ये सुनावणीला सुरूवात होणार आहे. राणा दाम्पत्याकडून अॅड रिझवान मर्चट तर सरकारकडून अॅड. प्रदीप घरात हे युक्तिवाद करणार आहे.
10:59 April 24
पोलिसांनी परिस्थिती चांगली हाताळली - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
काल राणा दाम्पत्यांच्या हट्टामुळे गोंधळ उडाला. त्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीस पठनाचा निर्णय घेण्याचे कारण नव्हते. राणा दाम्पत्य एवढ धाडस करू शकत नाही. त्यांच्या पाठीमागे मोठी शक्ती उभी आहे. त्याचा तपास सुरू आहे. पोलीस कॉल रेकॉर्डिंगचा देखील तपास करत आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच पोलिसांची चांगल्या पद्धतीने परिस्थिती हातळल्याचेही ते म्हणाले.
10:53 April 24
राणा दाम्पत्य कोर्टाकडे रवाना
राणा दाम्पत्याला बांद्रा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सांताक्रुझ पोलीस स्टेशनमधून त्यांना कोर्टाच्या दिशेने पोलीस घेऊन जात आहे. थोड्याच वेळात सुनावणी होऊन त्यांना जामीन की बेल याविषयीचा निर्णय लागेल. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
10:44 April 24
मातोश्रीसमोर जाण्याची गरज काय? - अजित पवार
मातोश्रीबाबत शिवसैनिकांच्या भावना पूर्वीपासूनच तीव्र आहे. राणा दाम्पत्यांनी श्रद्धेच्या ठिकाणी हनुमान चालीसा पठन करण्यास हरकत नव्हती. एकाद्या मंदिरात ते हनुमान चालीसा वाचू शकले असते. मात्र जिथे भावना तीव्र आहे, अशा ठिकाणी जाणे योग्य नाही. राणा दाम्पत्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. पोलिसांनी त्यांची समजूत घातली. स्वत: गृहमंत्री त्यामध्ये लक्ष घालून होते. मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यानंतरचा प्रकार सर्वांनाच माहिती आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
10:21 April 24
बंटी-बबलीला भाजपाने ताकद दिली - संजय राऊत
मुंबईत नुकतीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्रकारपरिषद पार पडली. त्यामध्ये त्यांनी, राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. अमरावतीच्या बंटी-बबलीला भाजपाने ताकद दिली आहे. त्यामुळे त्यांची हिम्मत होत आहे. भाजपाने मागून वार करू नये, समोर येऊन लढावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
10:01 April 24
बांद्रा न्यायालयाला छावणीचे स्वरूप
राणा दाम्पत्याला आज बांद्रा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान त्याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.
09:42 April 24
सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये हलवले
राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची रात्र पोलीस स्टेशनमध्येच गेली. आज त्यांना बांद्रा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळणार की बेल यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान राणा दाम्पत्यांना खार पोलीस स्टेशनमधून सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये हलवण्यात आले आहे.
09:19 April 24
रात्र पोलीस स्टेशनमध्ये
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa read at Matoshree) या मुद्द्यांवरुन राजकारण सुरु आहे. अशातच आज (23 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालीसा पठण (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) करणार होते. त्यासाठी आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार होते. मात्र, राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या मांडला होता. तर दुसरीकडे राणा यांच्या अमरावती येथील घरावर देखील शिवसैनिकांनी दगडफेक केली होती.
राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक - पंतप्रधान मोदी यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून रवी राणा आणि नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक (Rana Couple arrested by Khar Police) केली असून त्यांच्यावर 153 अ हे कलम लावण्यात आले आहे. आज राणा दाम्पत्याला बांद्रा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मागील दोन दिवसात काय घडलं..अगदी थोडक्यात -पोलिसांना चकवा देत राणा दाम्पत्य नागपूर मार्गे गुरुवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले होते. याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. तसेच मातोश्रीला सुरक्षेचे कवच दिले होते. तर काही शिवसैनिक हे राणा यांच्या खार येथील घराबाहेर ठिय्या देऊन होते. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानाबाहेर आले होते. मातोश्रीवर कोणाची येण्याची हिंमत नाही. त्यामुळे तुम्ही घरी जा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते. आज(शनिवार) सकाळी राणा दाम्पत्य यांनी फेसबूक लाईव्ह करत आम्ही मातोश्रीवर येणारच असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसैनिक मुंबईतील राणा यांच्या घराबाहेर आक्रमक झाले होते. त्यांनी बॅरिगेट्स तोडत राणा यांच्या घरात येण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच राणा दाम्पत्यांनाि परत अमरावतीला पाठवण्यासाठी त्यांच्या घराबाहेर एक Ambulance देखील तैनात केली होती. दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा रवी राणा यांनी आज दुपारी केली. त्यानंतरही हा वाद सुरूच राहिला. आज संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला नेले. तिथे गेल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केली आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप -आजच्या या सर्व प्रकरणावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप महिलांना समोर करून श्रीखंडीचे उद्योग करत आहे, हे हिजडेगिरी बंद करा, कोणाच्या तरी पाठबळाने आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक स्वस्त बसणार नाहीत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केली. याला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा करतात, याची साधी दखलसुद्धा घेतली जात नाही. हनुमान चालीसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर त्यांना थेट तुम्ही अटक करतात, सत्तेचा इतका माज चालणार नाही, असे फडणवीस म्हणाले. राणा दाम्पत्याच्या अटकेवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मुंबई पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर गेले नाही. त्यांनी कायद्याचे पालन केले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याला अटक करणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारकडून जुलमी राजवटीचे काम सुरू आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
हेही वाचा -Navneet Rana Arrest : मुंबई पोलिसांसमोर नवनीत राणा अमित शहा आणि पंतप्रधान मोदींना म्हणाल्या...