मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसांमध्ये राज्यात लॉकडाऊन घोषित करावा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा दिला आहे. त्याला अनुसरून प्रशासकीय स्तरावरसुद्धा काम केले जात आहे. राज्य कर्मचाऱ्यांना 50% उपस्थितीत काम करायचे आणि वर्क फ्रॉम होम करण्याचे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यलयाकडून काढण्यात आलेल्या पत्रकानुसार पोलीस खात्यात आता 50 टक्के उपस्थितीसह वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आले आहे.
LIVE : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; निर्बंध केले अधिक कडक
16:04 February 24
पोलीस खात्यात 50 टक्के उपस्थिती, वर्क फ्रॉम होम सुरू
16:02 February 24
कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
मागील दहा दिवसांपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या सद्य परिस्थिती आढावा घेण्यात आला.
14:14 February 24
कोरोनाचा धसका; महालक्ष्मी मंदिरातील भाविकांची संख्या मंदावली
कोल्हापूर - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे आणि त्याचाच परिणाम अंबाबाई मंदिरावर देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने भक्त अंबाबाईचे दर्शन घेत असतात. मात्र आज सकाळपासून खूपच कमी प्रमाणात भाविक येत आहेत.
प्रत्येक बुधवारी अंबाबाईच्या दर्शनाला भाविक कमी असतात. मात्र आजची परिस्थिती खूपच वेगळी असून दर्शनाच्या रांगा सुद्धा मोकळ्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील भाविकांनी पुन्हा एकदा कोरोनाचा धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
12:44 February 24
अष्टविनायक क्षेत्र महड, पाली येथे भक्तांसाठी दर्शनासाठी कडक नियमावली
अष्टविनायक गणपतीपैकी दोन गणरायाची स्थळे ही रायगडमध्ये महड आणि पाली येथे आहेत. लाखो भाविक महड वरदविनायक आणि पाली बल्लाळेश्वर चरणी नतमस्तक होण्यास येत असतात. राज्यात पुन्हा कोरोना संकट गडद होत चालले असताना अनेक जिल्ह्यात शासनाने संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी राज्यातील भक्ताचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे ही कोरोनाचे नियम पाळून खुली ठेवली आहेत. रायगड जिल्ह्यातील महड आणि पाली येथील अष्टविनायक पैकी दोन असलेली गणरायाचे दर्शन भाविकांना कोरोनाचे नियम पाळून मंदिर प्रशासनाकडून दिले जात आहे.
11:55 February 24
सध्याच्या कोरोनामध्ये संसर्ग वाढण्याचे प्रमाण जास्त
डिसेंबर नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. परंतु, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीत कोरोनाचे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोना संपला अशी मानसिकता आपली झाली होती. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर कमी केला; सॅनिटायझर न वापरने, सोशल डिस्टन्सिंग न राखणे अशा प्रकारे बेजाबाबदारपणाचे वर्तन दिसून आले. त्यामुळे कोरोना संपला असे गृहीत धरून राहणेच कोरोनावाढीसाठी कारणीभूत ठरले आहे. सध्याचा कोरोना बाधित रुग्ण हा कोरोनाचा जास्तीत जास्त प्रसार करणारा म्हणून गणला जात आहे. रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे जास्त दिसत आहेत. 85 टक्के रुग्ण हे या लक्षणांमध्ये आढळत आहेत.
11:12 February 24
हिंगोलीत नाईट कर्फ्यू लागू
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्येने आता शतक पार केले आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्री 7 ते सकाळी सात पर्यंत संचार बंदीचे आदेश लागू केले आहे. त्यामुळे आता सातच्या आत घरात राहणे नागरिकांना बंधनकारक असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला दंड ठोठावण्यात येणार आहे.
11:12 February 24
जालना जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत शैक्षणिक संस्था बंद
जालना जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर शहर व जिल्ह्यातील भाजीपाला, फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, दुकांनदारांची कोरोनाची अँटीजेन चाचणी अनिवार्य केली आहे. जालन्याचे पोलीस अधीक्षक व्ही देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली.
09:38 February 24
कोरोना नियमांचे उल्लंघन; मंत्री राठोडांच्या शक्ती प्रदर्शनावर शरद पवार नाराज
पूजा चव्हाण प्रकरणावरून चर्चेत असलेले मंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. पोहरादेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोड यांनी बंजारा समाजातील हजारो समर्थकांना एकत्र करून नियमांचा आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला. यावर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
09:03 February 24
नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच; तिसऱ्या दिवशीही ८ जणांचा बळी
- नागपुरात मंगळवारी ६९१ रुग्ण नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद
- तर सलग तिसऱ्या दिवशी ८ जणांचा मृत्यू
- कोरोना चाचणीवर प्रशासनाचा भर, पोलिसांच्याही कोरोना चाचण्या घेतल्या
- महानगरपालिकेकडून निर्बंध कडक, दंडात्मक कारवाई सुरू
07:50 February 24
जालन्यात कोरोनाचे निर्बंध कडक; दहा पथकांच्या माध्यमातून होणार कारवाई
- जालना शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला प्रतिबंध घालण्यासाठी शहरात दहा पथकांची स्थापना
- कोरोना नियमांचे उल्लघन करणाऱ्यावंर होणार दंडात्मक करवाई
- विना मास्क पाचशे रुपये, विना मास्क व्यवसाय करणाऱ्याला व्यावसायिकाला दोन हजार रुपये दंड
- मंगल कार्यालय चालकांना दहा हजार रुपये
07:17 February 24
हिंगोलीत लग्न समारंभासाठी घ्यावी लागणार जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी
- विवाह समारंभासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार
- परवानगीविना विवाह समारंभाचे आयोजन केल्यास वधू पक्ष व वर पक्षातील नागरिका विरुद्ध कारवाई
- संबंधित लॉन्स व मंगल कार्यालयास सील ठोकणार
- मंगल कार्यालय चालकाविरुद्ध नोंदवले जाणार गुन्हे
- व्हीआरआरटी पथक ठेवणार लक्ष
- वधु-वर पक्षाकडील मंडळी समोर अनेक प्रश्न
06:23 February 24
यवतमाळात लॉकडाऊनची शक्यता? पालकमंत्र्याचे सूचक वक्तव्य
मुंबई- राज्यात सध्या स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. बहुतांश शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती विभागातही कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मंगळवारी 23 फेब्रुवारीला 6218 रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. यवतमाळमध्ये पालकमंत्र्यांनी कोरोनाचा आढावा घेऊन शुक्रवारपर्यंत नागरिकांनी नियम न पाळल्यास लॉकडाऊन लावण्याचा सूचक इशारा दिला आहे.