कोल्हापूर - 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दुपारी दोन वाजल्यापासून या लसीकरणाला सुरुवात झाली असून तरुणांनी उत्स्फूर्तपणे या लसीकरणाला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रावर प्रायोगिक तत्त्वावर पुढील 7 दिवस हे लसीकरण सुरू राहणार आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक केंद्रावर जवळपास दोनशे जणांना लसीकरण करण्यात येणार आहे.
जाणून घ्या कोरोनाविषयीचे ताजे अपडेटस् एका क्लिकवर...
21:28 May 01
कोल्हापूर : लसीकरणाच्या पहिल्या दिवशी तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
21:26 May 01
लसीअभावी पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद; नागरिकांना मनस्ताप
पुणे - 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांसाठी आजपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु असे असले तरी पुण्यातील बहुतांश लसीकरण केंद्र पुरेशा लसींच्यासाठ्या अभावी बंद होती. फक्त पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन रुग्णालयातच आज लसीकरण सुरू होते. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत लसीकरण सुरू होते.
21:24 May 01
राज्यात 63 हजार 282 रुग्णांची नोंद, 802 मृत्यू
मुंबई -राज्यात आज (दि. 1 मे) 63 हजार 282 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे तर आज उपचारादरम्यान 802 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे. तसेच राज्यात 24 तासांत 61 हजार 326 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, असे असले तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.
21:22 May 01
मुंबई : लस घेण्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयाबाहेर नागरिकांच्या रांगा
मुंबई -मरोळ इथल्या सेव्हन हिल्स रुग्णालयाचा मुंबईतल्या पाच लसीकरणत केंद्राचा समावेश आहे. या लसीकरण केंद्रामध्ये आजपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. याच लसीकरणाचा तिसरा टप्पा देशात सुरू झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, पुरेशी माहिती नसल्याकारणाने लसीकरण केंद्राबाहेर लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
20:22 May 01
दिल्लीत आजच्या आज ऑक्सिजन पुरवा, उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारले
दिल्ली- येथील बत्रा रुग्णालयात आज (दि. 1 मे) दुपारी घडलेल्या दुर्घटनेत ऑक्सिजनअभावी आठ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत ऑक्सिजन पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीतही दिसत आहेत. आता पाणी डोक्यावरून गेले आहे. आम्हाला अंमलबजावणी हवी आहे. काहीही करून दिल्लीला आजच्या आज 490 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देत फटकारले आहे.
20:20 May 01
सायंकाळी सहा वाजेपर्यंत 26 जिल्ह्यात 11 हजार 492 लाभार्थ्यांचे लसीकरण
मुंबई -राज्यात आजपासून (दि. 1 मे) 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले.
18:32 May 01
बीडची ऑक्सिजनची चिंता मिटणार, नवीन 11 प्रकल्प सुरू होणार
बीड - .कोरोनाची महाभयंकर लाट सुरू आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक हैराण होत आहेत. कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन देता यावा यादृष्टीने बीड जिल्ह्यात नवीन 11 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याचा कार्यारंभ आदेशदेखील दिला असून येत्या दीड महिन्यात या प्रकल्पामधून प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली आहे.
17:12 May 01
उपराजधानी नागपुरात अठरा वर्षे वयोगटावरील नागरिकांचे लसीकरण सुरू
नागपूर- केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात आजपासून (दि. 1 मे) राज्यात 18 वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे. राज्याची उपराजधानी नागपूर शहरात देखील तीन ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत या महाअभियानाचा शुभारंभ करण्यात आला. आज केवळ प्रातिनिधिक स्वरूपात हे अभियान सुरू झाले असून प्रत्येक केंद्रावर केवळ 300 जणांना लस दिली जाणार आहे. तरी येत्या काळात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार आहेत. त्यावेळी लसीकरण केंद्र वाढवून तरुण वर्गाचे लसीकरण करणार असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली.
17:11 May 01
लस उपलब्ध नसल्याने मनमाडमधील लसीकरण ठप्प
मनमाड (नाशिक) -1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात आजपासून 18 वर्षंवरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र लस वेळवर न पोहोचल्याने अद्यापही अनेक केंद्रावरील लसीकरण सुरूच झाले नसल्याचे चित्र आहे. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात देखील हीच अवस्था आहे. लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. लसीकरण बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
16:58 May 01
राजवाडीत 14 ते 44 वयोगटातील 200 लाभार्थ्यांचे प्रतिकात्मक लसीकरण
मुंबई - देशभरात आजपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानुसार आज मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात प्रतिकात्मक 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. मोजक्याच लाभार्थ्यांना लसीकरणासाठी बोलावण्यात आल्याने लसीकरणाला गर्दी नव्हती.
16:27 May 01
जळगाव जिल्ह्यात फक्त 5 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील लसीकरण
जळगाव -केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आजपासून (1 मे) 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यात लसींचा मर्यादित पुरवठा झाल्याने अवघ्या 5 केंद्रांवर प्रातिनिधिक स्वरुपात लसीकरण होणार आहे. जिल्ह्यासाठी काल (शुक्रवारी) लसीचे साडेसात हजार डोस मिळाले आहेत. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सव्वाशे ते दीडशे नागरिकांना लस दिली जाणार आहे. दरम्यान, लसीचे डोस वेळेवर उपलब्ध न झाल्याने दुपारी 1 वाजेपर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती.
15:21 May 01
जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य नियोजनातून कोरोना नियंत्रणाचे 'नंदुरबार पॅटर्न'
नंदुरबार : आदिवासी मागासलेला जिल्हा अशी नंदुरबारची ओळख. शिक्षण, आरोग्य, विकास यापासून वंचित राहिलेला जिल्हा असतानादेखील अत्यंत कमी यंत्रणा व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने उत्तम नियोजन करणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आदिवासी जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यास यश मिळविल्याचे दिसत आहे.
12:55 May 01
पुण्यात 18 वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण
पुण्यात 18 वर्षांवरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे. अनेक तरूण या लसीकरणाचा लाभ घेताना दिसत आहेत.
11:05 May 01
लसीकरणास नागरिकांनी सहकार्य करा - राऊत
नागपूर :लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात करता येणार आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने ही मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी असे आवाहन नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
11:04 May 01
लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचा दुजाभाव - नाना पटोले
मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि केंद्राने लोकांना मरण्याच्या दारात सोडलं आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा नेतृत्वाचे अपयश यातून दिसून येत आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
11:04 May 01
रायगड जिल्ह्यात लसीचा साठा संपला
रायगड :जिल्ह्यातील लसीचा साठा संपल्याने 18 ते 44 वयोगतील नागरिकांच्या लसीकरणाचा आजचा मुहूर्त टळला आहे. लस नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण केंद्र आज बंद आहेत.
11:04 May 01
लसीकरणासाठी घाई न करता सहकार्य करा - पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव :राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण आजपासून सुरू होणार असल्याने नागरिकांनी आपली नोंदणी कोविन अॅपवर करावी. ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लस घ्यावी. इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सहकार्य करावे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून त्यांनी केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासीयांना केले आहे.
10:33 May 01
महापौरांची अक्षरशः हात जोडून विनंती
मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी अक्षरशः हात जोडून नागरिकांना डबल मास्क घालण्याची विनंती केली आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, मास्क वापरा अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली आहे.
10:23 May 01
धुळ्यात कोरोना रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी?
धुळे : कोरोना रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी कथितरित्या पैशांची मागणी करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार धुळ्यातून समोर आला आहे. यासंदर्भातील एक कथित व्हिडिओ व्हायरल होत असून यात रुग्णालयातील कर्मचारी बेड मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओनंतर या घटनेवर संताप व्यक्त होताना दिसत आहे.
08:59 May 01
लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड उभारा - राहुल शेवाळे
मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट तीव्र झालेले असतानाच दहा वर्षाखालील लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. या समस्येकडे सरकारने वेळीच लक्ष देऊन तज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयी त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. लहान मुलांकरता पीडियाट्रिक कोरोना वॉर्ड किंवा हॉस्पिटलची निर्मिती करा अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे केली आहे.
06:50 May 01
जाणून घ्या कोरोनाविषयीचे ताजे अपडेटस् एका क्लिकवर...
मुंबई :राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 62 हजार 919 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर उपचारादरम्यान 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.5% इतका आहे. राज्यात 24 तासात 69 हजार 710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. असे असले तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती -
राज्यात 69 हजार 710 रुग्ण 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 38लाख 68 हजार 976 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात नव्या 62 हजार 919 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 24 तासांत 828 रुग्णांचा मृत्यू झाला असून म्रुत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 46लाख02 हजार 472 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 62हजार 640 इतकी झाली आहे.
राज्यात कुठे किती रुग्ण?
मुंबई महानगरपालिका- 3888
ठाणे- 1353
ठाणे मनपा- 709
नवी मुंबई-524
कल्याण डोंबिवली- 846
मीराभाईंदर-534
पालघर-673
वसई विरार मनपा-866
रायगड-1002
पनवेल मनपा-599
नाशिक-1667
नाशिक मनपा- 2921
अहमदनगर-3152
अहमदनगर मनपा-737
धुळे- 192
जळगाव- 933
नंदुरबार-251
पुणे- 3602
पुणे मनपा- 4365
पिंपरी चिंचवड- 2052
सोलापूर- 2236
सोलापूर मनपा-535
सातारा - 2470
कोल्हापूर-806
कोल्हापूर मनपा-206
सांगली- 1064
सिंधुदुर्ग-301
रत्नागिरी-669
औरंगाबाद-594
औरंगाबाद मनपा-457
जालना-704
हिंगोली-196
परभणी -462
परभणी मनपा-248
लातूर 737
लातूर मनपा-199
उस्मानाबाद-1002
बीड -1,562
नांदेड मनपा-219
नांदेड-447
अकोला मनपा-439
अमरावती मनपा-198
अमरावती 449
यवतमाळ-1571
बुलडाणा- 864
वाशिम - 442
नागपूर- 2722
नागपूर मनपा-4448
वर्धा-1037
भंडारा-1025
गोंदिया-541
चंद्रपूर-945
चंद्रपूर मनपा-565
गडचिरोली-522