मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानं उच्चांक गाठला आहे. दोनदा कोरोनाची लस घेणाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये लॉकडाऊनबाबत एकमत झाले आहे. उद्या टास्कफोर्सची बैठक बोलाविण्यात आली असून त्या बैठकीतच लॉकडाऊन लावायचा व किती दिवसांचा लावायचा याचा निर्णय होणार आहे. याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदि उपस्थित होते. सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. बैठकीत दिलीप वळसे-पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, तात्याराव लहाने, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे बैठक पार पडली. बैठकीत कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर चर्चा करण्यात आली. सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती बैठकीत दिली.
जनतेला सरकारच्या प्लॅनची कल्पना द्या- फडणवीस
या बैठकीत सामान्य जनतेच्या सोयीसाठी काय करता येईल याबाबत नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात 8 दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. दोन तास ही बैठक चालली. यामध्ये विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घ्यावा, आमचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा आहे. सरकारच्या निर्णयाची जनतेला माहिती द्या. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. अजित पवारांनी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी काय पॅकेज देता येईल, ते सोमवारी ठरविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
आज चर्चा झाली, निर्णय उद्या होईल - अशोक चव्हाण
राज्यामध्ये कोरोनाचा आकडा सव्वापाच लाखांवर गेला आहे. यामुळे तातडीने कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. एकीकडे हा विषय असताना सामान्यांवरील संकटही आहे. मुख्यमंत्री दोन दिवसांत रोडमॅप तयार करणार आहेत. ती झाल्यानंतर कडक लॉकडाऊन करण्यात येईल, नंतर हळूहळू हे निर्बंध शिथील करण्यात येतील, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. आज चर्चा झालीय, निर्णय झालेला नाहीय, उद्या यावर चर्चा होईल असे ते म्हणाले. लोक वाचले पाहिजेत, असे चव्हाण यांनी सांगितले.