कोपरगाव (अहमदनगर)- तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने दुकानात गर्दी करू नका, मास्क वापरा, असे वारंवार प्रशासनाकडून आहवान करूनही काही ठिकाणी नियमांचे पालन केल जात नसल्याने कोपरगाव शहरातील दुकाने आता सात दिवसांसाठी सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे. यामुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यातील कोरोना स्थिती बिकट; पाहा दिवसभरातील सर्व घडामोडी
18:47 March 27
कोपरगाव शहरातील दुकाने सात दिवसांसाठी बंद
18:33 March 27
बुलडाण्यात दुकानदारांवर कोरोना चाचणी बंधनकारक
बुलडाणा - शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्वच आस्थापना, दुकानदार, हॉटेलचालक व या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या बुधवारपर्यंत या सर्वांनी आपली चाचणी करून घेण्याचे आवाहन बुलडाणा नगर परिषद प्रशासनाने केले आहे. कोरोना चाचणी न करणाऱ्या आस्थापना, दुकानदार, हॉटेलचालकांवर दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगर परिषदेने दिला आहे.
18:29 March 27
सिंधुदुर्गच्या सीमांवर आरोग्य विभागाची पथके तैनात, चाकरमान्यांची केली जाते तपासणी
सिंधुदुर्ग- कोकणात होळी सणानिमित्त चाकरमानी दाखल होऊ लागले आहेत. मात्र, चाकरमान्यांच्या येण्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी करूनच त्यांना जिल्ह्यात सोडण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण येथे जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांची आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.
17:34 March 27
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात 5 एप्रिलपासून निर्बंध
पालघर- जिल्ह्यात (वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून) मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली मोठी वाढ लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून येत्या 5 एप्रिलपासून शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने, मॉल्स, हातगाडी व ठेल्यांवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसह अनेक बाबींवर वेळेचे व नागरिक क्षमतेचे निर्बंध लादण्यात आले आहेत.
17:20 March 27
औरंगाबादमध्ये रुग्णालयात जागा मिळेना; एका खाटावर दोन रुग्णांवर उपचार?
औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे. रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी खाट उपलब्ध होत नसल्याने एकाच खाटावर दोन ते तीन जणांना उपचार द्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आता उपचार घ्यायचे तरी कसे हा प्रश्न रुग्णांना पडला आहे.
17:18 March 27
नंदुरबार जिल्ह्यात 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत पूर्णतः संचारबंदी
नंदुरबार - कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात 31 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत पूर्णतः संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार. त्याच बरोबर बससेवा देखील बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
17:11 March 27
शनिवारी, रविवारी सोलापूर जिल्ह्यात टाळेबंदी
राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात सोलापूर शहर व जिल्ह्यात 4500 जण सक्रीय रुग्ण आहेत. शुक्रवारी दिवसभरात 614 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून कडक प्रतिबंध करण्यात आले आहेत. सोमवार ते शुक्रवारीपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहे. तर शनिवारी व रविवारी सोलापूर जिल्हा संपूर्ण टाळेबंदी असल्याचे पाहायला मिळाले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर परिसरात तुरळक गर्दी होती.
17:07 March 27
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. शनिवारी ट्विट करून त्याने याबाबत माहिती दिली. तेंडुलकर घरातच विलगीकरणात आहे.
16:14 March 27
कोविड चाचणीचे प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
यवतमाळ- कोरोनाने थैमान घातल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यातूनच यवतमाळ तहसीलदारांनी कोरोनाला रोखण्यासाठी तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तरच दुकाने उघडता येणार अन्यथा बंद ठेवावी लागतील, अशी सूचना व्यापाऱ्यांना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार, नगरपरिषद तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यवतमाळ शहरात कोविड चाचणीचे प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
16:08 March 27
कोरोनाचे नियम पाळा; मिशन ऑल आउटचे मुंबईत आहे लक्ष
नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई मनपाच्या संयुक्त विद्यमाने मिशन 'ऑल आउट' उपक्रम नवी मुंबई शहरात राबवला जात आहे. या उपक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. या मिशन ऑल आऊट मध्ये 600 पोलीस व 200 पोलीस मित्रांचा सहभाग आहे. मिशन ऑल आउट उपक्रमांतर्गत कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आखलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ-1 चे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.
15:52 March 27
नवी मुंबई शहरात होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
13:27 March 27
यवतमाळ शहरात कोविड चाचणीचे प्रमाणपत्र नसणाऱ्यांवर कारवाई
कोरोनाने थैमान घातल्याने यंत्रणा अलर्ट झाली आहे. त्यातूनच यवतमाळ तहसीलदारांनी कोरोनाला रोखण्यासाठी तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तरच दुकाने उघडता येणार, अन्यथा बंद ठेवावे लागेल, अशी सूचना व्यापाऱ्यांना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार, नगरपरिषद तसेच पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने यवतमाळ शहरात कोविड चाचणीचे प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
13:26 March 27
सोलापूर स्थानिक प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी कोरोना रुग्ण आढळण्याचा उद्रेक झाला आहे. शहर आणि ग्रामीण असे 640 बाधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली असून शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आता नव्या नियमावलीनुसार सातच्या आत घरात जावे लागणार आहे.
13:26 March 27
बाळासाहेब पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला
सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. ही लस पुर्णत: सुरक्षित असून लसीबाबत कोणतीही शंका न बाळगता सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
12:45 March 27
प्रतिबंधात्मक लसीकरणाला आता वेग
सिंधुदुर्ग जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला आता वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 859 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर 5 हजार 832 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सद्यस्थितीत 4 हजार 512 लसी शिल्लक असून आणखी 20 हजार लसींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आता जिल्हा रुग्णालयसह 51 ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून जिह्यातील सर्व 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली
12:44 March 27
आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
धुलीवंदन साजरे करण्यास नवी मुंबई मनपाच्या माध्यमातून मनाई केली आहे. जे आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.
12:42 March 27
मुंबई शहरात होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात होळी व धुळवड साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेेे आहेत.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई व पनवेल शहरात होळी व धुलीवंदन एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास महापालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मनाई करण्यात आली आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, गृहनिर्माण सोसायटयामधील मोकळ्या जागेत होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
12:39 March 27
परिस्थिती सुधारली नाही, तर आठ दिवसांनंतर लॉकडाऊन - छगन भुजबळ
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती येत्या आठ दिवसांमध्ये सुधारली नाही. तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. भुजबळांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात रोज 2500 हुन अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवर देखील ताण वाढला आहे. को
11:50 March 27
नंदुरबारमध्ये 15 एप्रिलपर्यंत शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्या अनुषंगाने नंदुरबार बस आगारातून जिल्हा व जिल्हा अंतर्गत बस सेवा बंद राहतील. तर सोमवारी बससेवा पूर्ववत होईल. यामुळे नंदुरबार बस आगाराचे शनिवार व रविवार या दोन दिवसात लाख रुपयांचे नुकसान होणार असल्याची माहिती आगर प्रमुखांनी दिले आहे.
11:49 March 27
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी रुग्ण घटले , तर मृत्यू वाढले
नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी 970 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. पण मृत्यूची संख्या मात्र 14 वर पोहोचली असून चिंता वाढविणारी आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे 369 तर अँटिजेन तपासणीद्वारे 601 अहवाल बाधित आहेत. आजचे 970 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 37 हजार 525 एवढी झाली आहे.
11:30 March 27
नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची दुसरी लाट
कोरोनाची लाट पुन्हा दुसर्यांदा आली असून अनेक ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहे. संगमनेर तालुक्यात ही वाढणारी रुग्ण संख्या अत्यंत चिंताजनक असून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता गर्दी टाळत, नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करून स्वत:ची काळजी घ्यावी म्हणजे आपली व आपल्या परिवार कोरोनापासून सुरक्षित राहील, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. कोरोना हे मानव जातीवरील मोठे संकट आहे, मागील कोरोनाची लाट लाट रोखण्यात प्रशासनाला यश आले. मात्र नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची दुसरी लाट आली आहे, असेहगी ते म्हणाले.
11:30 March 27
मुंबईत कोरोनाचा फैलाव
सोमवारपासून मुंबईतील कोणत्याही मॉलमध्ये तुम्हाला सरळ जाता येणार नाही. आधी कोरोनाची अॅण्टीजेन टेस्ट, रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच मॉलमध्ये प्रवेश मिळेल. मेल, एक्सप्रेस, रेल्वे स्टेशनसह मॉल्स, क्लब, व्यापारी संकुले, चित्रपटगृहे, एसटी स्थानकांमध्येही प्रवेश करण्यासाठी ही टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. राज्यभरात नवे निर्बंध लागू झाले असतानाच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणखी कडक उपाय जारी केले. वारंवार सांगूनही मुंबईकर ठिकठिकाणी गर्दी करत आहेत आणि कोरोनाचे नियमदेखील पाळत नाहीत.
10:24 March 27
लातूर जिल्ह्यातील पानटपरी, चहाटपरी, जिम, मंगल कार्यालये, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद
लातूर जिल्ह्यातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी निर्बंध जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, पर्यटनस्थळे, पानटपरी, चहाटपरी, मंगल कार्यालये, चित्रपटगृह, नाट्यगृह, सभागृहे बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. हॉटेल, बार, परमिट रूम याठिकाणी फक्त पार्सल सुविधा राहणार असून लातूर जिल्ह्यात होळी, रंगपंचमी, धुलीवंदन आपल्या कुटुंबात स्वगृही साजरे करण्याचे आदेश दिले आहेत. २७ मार्च पासून या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात होणार आहे.
10:23 March 27
बारामतीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ
बारामतीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील पाच दिवसात तब्बल ६५० रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढवणारा आहे. सध्या बारामतीतील दोन्ही शासकीय रुग्णालय व चार ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर फुल झाले आहे.
09:23 March 27
नागपूरात कोरोनाचा उद्रेक
उपराजधानी नागपुरात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना रुग्णसंख्या मिळण्याचा नवीन विक्रम पाहायला मिळत आहे शुक्रवारी आलेल्या अहवालात 4 हजार पार नागपूर जिल्ह्यात तर 5 हजार पार हे पूर्व विदर्भात कोरोना बाधित मिळून आले आहे. तेच तर 35 जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाला आहे.
08:46 March 27
कोरोनाची परिस्थिती गंभीर, आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनवर
नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. शासकीय रुग्णालयात आकस्मिक रोग विभागात एकाच बेडवर दोन रुग्ण झोपण्याची वेळ आली आहे. यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असताना बेड मिळत नसल्याची ओरड होऊ लागली आहे. यात दररोज कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे.
08:45 March 27
नवी मुंबई शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत आहे नियमांचे उल्लंघन
नवी मुंबई शहरात होत असलेली कोरोना रुग्ण संख्येची वाढ चिंताजनक ठरत आहे. ही वाढ दिवसेंदिवस अधिकच होत आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली मिशन ऑल आउट मोहीम राबविण्यात येत आहे. यात सामाजिक अंतर न पाळळे, मास्क न घालणे अशांवर कारवाई करण्यात येत आहे.
06:24 March 27
मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला असून या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील सूचना केल्या असून मदत व पुनर्वसन विभागाकडून याचे आदेश निर्गमित व्हावे असेही म्हटले आहे. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयांचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी राज्यातील कोरोनासंदर्भातील स्थितीचा आढावा घेतला. राज्यात लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जनतेने नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
06:23 March 27
राज्यात रक्ताचा तुटवडा
कोरोनाच्या संकटात राज्यात रक्ताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे निरोगी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मुंबई सध्या सात ते आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळे रक्तदात्यांना पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. मात्र ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांनी 28 दिवस रक्तदान करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.
06:23 March 27
गेल्या 24 तासांत 17 हजार 019 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारीही कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या 36 हजार 902 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजार 735 वर गेली आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्यात आली आहे.
06:17 March 27
राज्यातील कोरोना स्थिती बिकट; पाहा दिवसभरातील सर्व घडामोडी
मुंबई -गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र होतं, पण आता रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारण 8 ते 9 टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. पण देशात सध्या 60 टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाय योजानाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जास्त रुग्ण असलेल्या काही शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी टाळण्याकरिता काही कठोर उपाय योजण्यात आल्या आहेत.