यु-ट्यूबवर कोलकातामधील घोड्यांच्या शर्यतीवर लाईव्ह सट्टेबाजी, 4 जणांना अटक - घोड्यांच्या शर्यतीवर बेटींग
मुंबईतील माटुंगा परिसरामध्ये कोलकाता येथील रॉयल कोलकाता टर्फ क्लब येथे सुरू असलेल्या घोड्यांच्या शर्यतीवर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सट्टेबाजी घेणाऱ्या 4 आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई - मुंबईतील माटुंगा परिसरामध्ये कोलकाता येथील रॉयल कोलकाता टर्फ क्लब येथे सुरू असलेल्या घोड्यांच्या शर्यतीवर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सट्टेबाजी घेणाऱ्या 4 आरोपींना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट-3 ने अटक केली आहे.
घोड्यांची शर्यत युट्युबवरून पाहत होते लाइव्ह -
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून कोलकाता येथील रॉयल कोलकाता टर्फ क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या घोड्यांच्या शर्यतीचे थेट प्रक्षेपण युट्युबवरून सुरू होते. याचा फायदा घेत या आरोपींनी युट्युबवरील लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे या घोड्यांच्या शर्यतीचा सट्टा घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी माटुंगा परिसरातील संकल्पसिद्धी या इमारतीतील एका फ्लॅटवर छापा मारला असता एका आरोपीला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपीच्या केलेल्या चौकशीदरम्यान आणखीन 3 जणांची नावे समोर आल्यानंतर आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत 10 मोबाईल फोन व अडीच लाख रुपये रोकड हस्तगत केली आहे.
सट्टेबाजीत काही जणांना फसविले -
पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींनी गेल्या काही महिन्यांपासून घोड्याच्या शर्यतीवर यूट्यूबच्या माध्यमातून लाइव्ह सट्टेबाजीत सुरू केली होती. या आरोपींकडून पोलिसांना सट्टेबाजी लावणाऱ्या काही व्यक्तींचे मोबाईल क्रमांक व नावे सुद्धा मिळाले आहेत. दरम्यान या चौघांनी काही जणांची आर्थिक फसवणूक केल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.