मुंबई - आज सकाळी दहा वाजल्यापासून मुंबईत वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीडच्या फेल्युअरमुळे हा पुरवठा थांबला. यामुळे मुंबईसह उपनगरातील बँका, कार्यालये, रेल्वे या सगळ्यावर त्याचा परिणाम झाला. रेल्वेसेवा खोळंबली. अनेक ठिकाणी कोविड सेंटर्समध्ये सेवा पुरवण्यासंबंधी देखील प्रश्न उपस्थित झाले. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्याने किती नुकसान होते, याबाबत कधी प्रश्न पडलाय का?
मुंबईत वीज गेल्याने एका तासात जवळपास 258 कोटींचे नुकसान होत असल्याचे अनुमान आहे. त्याचा थेट परिणाम देशातील 25 टक्के औद्योगिक उत्पादनावर पडतो. देशातील 70 टक्के समुद्री व्यापार मुंबईतून होतो. मुंबईत मोठ्याप्रमाणात बँकांपासून अन्य सरकारी कार्यालयांची मुख्यालये आहेत. याचा प्रभाव देशभरातील 70 टक्के व्यवहारांवरही पडतो.
कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनपासून देशभरातील आर्थिक व्यवहारांना खीळ बसली. मुंबईत मोठ्या प्रमाणात कामगार माघारी गेले. कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. तसेच काही ठिकाणी कार्यालये सुरू झाल्यानंतर लोकलने फक्त अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांना परवानगी देण्यात आलीय. अशात मुंबई पूर्वपदावर येत असताना फक्त वीजपुरवठा खंडित झाल्याने आर्थिक राजधानीला झळ सोसावी लागली.
टाटा पॉवर प्लांटच्या विद्युतपुरवठा ग्रीडमध्ये वितरणांसंबंधी अडथळा आल्याने मुंबई आणि उपनगरातील वीज गेली. ठराविक वितरणापेक्षा वीजपुरवठा कमी आल्याने संपूर्ण वितरणात समस्या आल्याची माहिती टाटा समूहाने दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात मुंबईसारख्या मोठ्या शहराला दोन विविध पॉवर सोर्सेस मार्फत विद्युतपुरवठा होण्याची आवश्यकता आहे. यामुळे पॉवर ग्रीडबाबत पर्याय उपलब्ध होईल.