महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 10, 2021, 3:31 PM IST

ETV Bharat / city

'गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीवरील स्थगिती उठवा'

म्हाडाच्या मुंबई मंडळाने 1 मार्च 2020 रोजी गिरणी कामगारांच्या 3894 घरांसाठी लॉटरी काढली होती.

म्हाडा मुंबई
म्हाडा मुंबई

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाने 1 मार्च 2020 रोजी गिरणी कामगारांच्या 3894 घरांसाठी लॉटरी काढली होती. पण ही लॉटरी काढताना मुंबई मंडळाने देखरेख समितीच्या नियमाचे पालन केले नाही, असा ठपका ठेवत देखरेख समितीने काही दिवसांतच या लॉटरीला स्थगिती दिली. ही स्थगिती देऊन आता 11 महिने झाली असून कामगारांचे घराचे स्वप्न लांबत चालले आहे. त्यामुळे ही स्थगिती उठवावी, अशी मागणी आता मुंबई मंडळाकडुन देखरेख समितीकडे केली जात आहे. तसा अहवाल मंडळाने समितीला दिला असून लवकरच यावर सुनावणी होणार आहे. तेव्हा ही स्थगिती उठेल, असा विश्वासही मंडळाने व्यक्त केला आहे.

'या' मिलमधील घरांसाठी काढली होती लॉटरी

मुंबईतल्या बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधली जात आहेत. तर या घरांची लॉटरी म्हाडाच्या माध्यमातून काढली जाते. त्यानुसार आतापर्यंत 12000 हुन अधिक घरांची लॉटरी काढण्यात आली. यातीलच एक लॉटरी म्हणजे 1 मार्च 2020 ला निघालेली 3894 घरांची लॉटरी. यात बॉम्बे डाइंग, बॉम्बे डाइंग-स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिल या तीन मिलमधील घरांची ही लॉटरी होती. तर ही घरे तयार असून आता घर कधी मिळणार, याची प्रतीक्षा विजेत्या कामगारांना आहे.

यामुळे लॉटरीला स्थगिती-

1 मार्च 2020 ला मुंबई मंडळाने लॉटरी काढली. पण ही लॉटरी काढताना उच्च न्यायालयाने गिरणी कामगारांच्या घरांसाठी स्थापन केलेल्या देखरेख समितीच्या आदेशाचा भंग केल्याचे म्हटले. एका गिरणी कामगार संघटनेने या लॉटरीवर आक्षेप घेतला. तर याविरोधात समितीकडे धाव घेतली. त्यानुसार लॉटरी झाल्यानंतर काही दिवसांतच समितीने या लॉटरीला स्थगिती दिली. देखरेख समितीची परवानगी न घेता, समितीच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन न करता लॉटरी काढल्याचा ठपका ठेवत समितीने ही स्थगिती दिली.

त्यानंतर कोरोना काळ सुरू झाला आणि मग पुढे आजपर्यंत समितीची बैठक झालीच नाही. त्यामुळे 11 महिने झाले स्थगिती कायम आहे. तर याचा मोठा फटका विजेत्या कामगारांना बसत असल्याचे मुंबई मंडळाचे म्हणणे आहे. हीच बाब लक्षात घेता आता ही स्थगिती उठवण्याची मागणी मंडळाकडून केली जात आहे.

लवकरच सुनावणी-

मार्च 2020 मध्ये देखरेख समितीची बैठक झाली होती. त्यानंतर सुनावणी झालेली नाही. पण आता लवकरच या महिन्याभरात सुनावणी होणार असून यावेळी स्थगिती उठेल, असा विश्वास मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. दरम्यान समितीच्या आदेशानुसार आम्ही आमचा अहवाल देखरेख समितीकडे सादर केला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार छाननी करण्यासह इतर कोणत्या-कोणत्या प्रक्रिया करण्यात येत आहेत. याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे. त्यामुळे ही स्थगिती उठेल, असा विश्वास असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

स्थगिती उठली तर कामगारांना शक्य तितक्या लवकर घरांचे वितरण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. कामगारांना तात्काळ इंटिमेशन लेटर देण्याची तयारी आम्ही पूर्ण केली आहे. तेव्हा स्थगितीमुळे घराचे वितरण लांबले असले तरी पुढे घर मिळण्यास विलंब होणार नाही, असा दावा ही त्यांनी केला आहे.

हेही वाचा-भंडारा जळीतकांड : आगीचे रिपोर्ट दोन दिवसात मिळणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

हेही वाचा-यवतमाळमध्ये गोळ्या घालून ठार मारलेली टी -१ वाघीण नरभक्षक नव्हती, याचिकाकर्त्याचा न्यायालयात दावा

ABOUT THE AUTHOR

...view details