मुंबई- अनेक खासगी कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र भारतीय आयुर्विमा महामंडळ सारख्या विश्वसनीय कंपनीने दीपक कोठारी नावाच्या ग्राहकाची फसवणूक केली आहे. त्यामुळे कोठारी यांना जसा धक्का बसला, तसाच वाचकांनाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
कोठारी यांना जीवन सरल पॉलिसीच्या परताव्यात महामंडळाने चक्क लाखो रुपयांना फसवले. त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जहांगीर घई या वकिलांनी तब्बल दोन वर्षे राज्य ग्राहक संरक्षण आयोगात लढा दिला.
'एलआयसी'कडूनही विश्वासघात; मुंबईत पॉलिसी धारकाची लाखोंची फसवणूक काय आहे दीपक कोठारी एलआयसी प्रकरण ?
दीपक कोठारी या व्यक्तीने जीवन सरल पॉलिसी काढली. या पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे कोठारी यांनी जहांगीर यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत संपर्क साधला. यानंतर जहांगीर गई यांनी ग्राहक संरक्षण आयोगामार्फत कोर्टात याचिका दाखल केली. ग्राहक संरक्षण आयोगाच्या सुनावणीत केवळ टायपिंग मिस्टेक झाल्याचे कारण सांगून एलआयसी महामंडळाने चूक मान्य केली. परंतु, संबंधित पॉलिसी कोठारी यांना देणार नसल्याचे एलआयसीने सांगितले.
तरतुदी नुसार दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून आयोगाने कोठारींची फसवणूक झाल्याचा निकाल दिला. तसेच एलआयसी महामंडळाला समन्स बजावला. यानंतर महामंडळाने कोठारी यांची व्याजासह भरपाई केली. परंतु, या प्रकरणानंतर विश्वासार्ह असलेल्या एलआयसी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ग्राहक खासगी कंपनीकडे न जाता भारतीय आयुर्विमा महामंडळावर विश्वास दाखवतात. मात्र, महामंडळच फसवणूक करत असेल तर, आता कुणाकडे पाहायचे असा प्रश्न कोठारी यांनी उपस्थित केला आहे.