मुंबई - केस किंवा दाढी करायला महिन्यात दोनदा तरी सलूनमध्ये जावेच लागते. मुंबईत अनेक सलून आहेत. मात्र, सध्या कांजूरमार्ग येथील रवींद्र बिरारी यांच्या सलूनची जोरदारचर्चा अवघ्या मुंबईभर सुरू आहे. रवींद्र यांनी त्यांच्या सलूनमध्ये चक्क वाचनालयच उभारले आहे. मोबाईल हाताळण्यापेक्षा वाचनाची गोडी तरुणांना लागावी यासाठी हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. 'हेअर क्राफ्ट' असे त्या सलूनचे नाव आहे.
मोबाईल आला आणि तरुणपिढीचे वाटोळे झाले हे शब्द सहज आपल्या कानावर पडतात. तरुणपिढीला वाचनाची गोडी लागावी यासाठी रवींद्र बिरारी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी कांजूरमार्ग येथील त्यांच्या सलूनमध्ये चक्क वाचनालयच उघडले आहे. त्यांच्या सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांना वाचण्यासाठी त्यांनी 70 पेक्षा जास्त पुस्तके ठेवली आहेत. यामुळे त्यांच्या सलूनमध्ये येताच बिरारी यांच्या ग्राहकांच्या हातात मोबाईल नाही, तर पुस्तक दिसून येतात. तसेच सलूनच्या आत येताय, तर मग मोबाईल खिशात ठेवा आणि जरा पुस्तक वाचा, असे ठणकावून बिरारी ग्राहकांना सांगतात.