मुंबई- विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही मुंबई महापालिकेकडून तीन लोकप्रतिनिधी नगरसेवक पदाचे मानधन घेत असल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. याबाबत माध्यमांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यावर भाजपाचे आमदार पराग शाह यांनी आपल्याला नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन बंद करावे, असे पत्र महापालिकेला दिले आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपयांच्या निधीची मदत जाहीर केली आहे.
तीन आमदार घेतात नगरसेवकांचेही मानधन -
मुंबई महापालिकेतील जे नगरसेवक आमदार आणि खासदार म्हणून निवडून गेले आहेत, अशा किती लोकांना पालिकेकडून मानधन दिले जाते. याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या चिटणीस विभागाकडून मागवली होती. त्यावर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, भाजपाचे आमदार पराग शहा आणि शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांस दरमहा 25 हजार रुपये मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता 150 रुपये भत्त्यासाठी अशा केवळ चार सभांकरिता दिले जातात असे महापालिकेच्या चिटणीस विभागाने कळविले आहे. तसेच भाजपाचे खासदार म्हणून निवडून आलेले मनोज कोटक आणि शिवसेनेचे आमदार रमेश कोरगावकर हे नगरसेवकपदाचे मानधन घेत नाहीत असे कळविले आहे. राजकीय पक्षाने जे नगरसेवक आमदार आणि खासदार बनले आहे त्या ठिकाणी राजीनामे घेणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने कुठल्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत कमीत कमी मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते, असे अनिल गलगली यांनी म्हटले आहे.