मुंबई -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले होते. याबाबत अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या कार्यालयात आपण चौकशीसाठी उपस्थित राहू, असे पत्र अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केल आहे.
माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांचे पत्र हेही वाचा -आरोप प्रत्यारोपानंतर नारायण राणेंनी घेतले बाळसाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन, म्हणाले...
सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांमध्ये आपल्याला खालच्या न्यायालयात जाण्याबाबत देखील सांगितले असल्याचे या पत्रातून अनिल देशमुख म्हणाले.
सीबीआयविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांची सीबीआयकडूनजी चौकशी सुरू आहे याबाबत दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख यांनी याचिका केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने काल 18 ऑगस्ट रोजी ही याचिका फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. मात्र, ईडीच्या चौकशीबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज स्वीकारली आहे, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण ईडीसमोर चौकशीसाठी हजर होऊ, असा या पत्रातून अनिल देशमुख म्हणाले.
अनिल देशमुखांना फरार घोषित करण्याची सोमैय्यांची मागणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी केली आहे. तसेच, पाच वेळा समन्स बजावूनही ईडी (सक्तवसुली संचलनालय) कार्यालयात अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात यावे, अशी मागणी मुंबईत पत्रकार परिषदेतून किरीट सोमैय्या यांनी काल (18 ऑगस्ट) केली होती.
काय आहे प्रकरण ?
मुंबईतील हॉटेल मालकांकडून अवैधरित्या शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून केला होता. 20 मार्च रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा आरोप केला होता. या आरोपानंतर उच्च न्यायालयात देखील याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या आधारावर ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर 2 जुलैला छापेमारी करण्यात आली.
मुंबई, नागपूर आणि गृहमंत्री असताना त्यांना देण्यात आलेले शासकीय निवासस्थानी धाड सत्र करण्यात आले. या धाडीनंतर देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, यासाठी आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आला आहे. तर, तिथेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजवलेला आहे. यासोबतच शंभर कोटींच्या आरोपाबाबत अनिल देशमुख यांची सीबीआयकडून देखील चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचा -युतीत असताना आमचा श्वास कोंडला होता, आगामी विधानसभेला स्वबळावर सत्तेत येऊ -फडणवीस