मुंबई : राज्यात शिवसेनेसमोर एकनाथ शिंदे यांच्या नावाने उभे राहिलेले ( Eknath Shinde in front of Shiv Sena ) बंडाचे वादळ या पूर्वीदेखील शिवसेनेमध्ये अनेक नेत्यांच्या मार्फत आलेले आहे. शिवसेना स्थापन झाल्यानंतर शिवसेनेमध्ये अशा बंडाची अनेक उदाहरणे ( ( Influential rebel leaders in the Shiv Sena ) देता येतील. उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक आणि आता एकनाथ शिंदे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी या पूर्वीदेखील शिवसेनेच्या विरोधात बंड केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेला बंडाचा जुना इतिहास आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ : एकनाथ शिंदे यांच्या या बंडाची माहिती जगजाहीर होताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शिंदेंच्या मनधरणीसाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. पण, मंगळवारी संध्याकाळचे 5 वाजून गेले तरी या बंडावर तोडगा निघाला नाही. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उरलेल्या आमदारांची बैठक घेत शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आणि त्यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवले.
शिवसेना ही आपल्या आक्रमक स्वभावामुळे वाढली अन् रुजली. तसे अनेक नेतेही शिवसेनेने तयार केले. त्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासारखे बहुजन समाजातील नेतृत्व पुढे आलं. त्यांना शिवसेनेनं ताकदही दिली. पण, आपलं कष्ट अन् कर्तृत्व अधिक असतानाही आपल्याला डावललं जात असल्याची भावना भुजबळांच्यात वाढली. पुढे मनोहर जोशी यांना विरोधी पक्ष नेते पद दिले. तेव्हा ही भावना भुजबळ यांच्या मनात वाढली आणि मंडल आयोगाला सेनेकडून विरोध होताच ओबीसीची बाजू घेत भुजबळ सेनेतून 1991 साली 18 आमदार घेऊन बाहेर पडले. आपला वेगळा गट त्यांनी विधानसभेत तयार केला. मात्र, सेनेतून बाहेर पडल्यानंतर निष्ठावंत अन् कडव्या शिवसैनिकांनी भुजबळांना प्रचंड त्रास दिला. त्यांच्यावर कडव्या शिवसैनिकांनी हल्लेही केले. अगदी मंत्री असताना मिलिंद वैद्य यांनी लखोबाच्या घोषणा देत दगडफेक केली. हेच वैद्य पुढे मुंबईचे महापौर झाले, तर शिवसैनिकांनी भुजबळांच्या सरकारी A10 या बंगल्यावर हल्ला केला होता. त्याचं नेतृत्व विलास अवचट यांनी केलं होतं. पुढं ते एका महामंडळाचे अध्यक्ष झाले होते.
गणेश नाईक : गणेश नाईक हे शिवसेनेतील तगडे नेते होते. युती सरकारमध्ये ते वनमंत्री होते. त्यांनाही बाहेर पडावं लागलं. गणेश नाईक यांना कडव्या शिवसैनिकांच्या रागाला रस्त्यावर सामना करावा लागला नाही, तरी विधान सभा निवडणुकीत परभवाचा सामना करावा लागला होता.
नारायण राणे : नारायण राठे यांनी मोठं बंड केलं. 2005 साली उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपण सेनेतून बाहेर पडत आहोत, असा आरोप करीत ते बाहेर पडले. त्यांच्यासोबत 11 आमदार होते. राणे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात कोकणात खूप काळपर्यंत राडा सुरू होता. राणे समर्थकांनी मुंबईत सामनाचा अंक जाळण्यापर्यंत प्रतिउत्तर दिले होतं.