मुंबई -शहरातील फेवरेट, गरिबांची पोट भरणारा आणि श्रीमंतांच्या जिभेचे चोचले पुरवणारा आणि प्रत्येकाला खावा वाटणारा खाद्यपदार्थ म्हणजे वडापाव. वडापाव सर्वत्र मिळतो. मात्र, शिवडीतला भट्टी वडा ही खवय्यांसाठी एक वेगळीच पर्वणी आहे. हा वडा शिवडी शिवाय कुठेच मिळत नाही. चला तर मुंबईतल्या शिवडी येथील भट्टी वडाबद्दल जाणून घेऊया.
मुंबईतल्या शिवडीचा भट्टी वडा खाल्लाय का? चला जाणून घेऊ या भट्टी वड्या बद्दल घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांसाठी खाऊ गल्ल्या म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी ओळख आहे. कामाचा अतिताण, त्यात वेळेचा अभाव, पोटाची खळगी आपल्या वेळेनुसार व सोयीनुसार या आधुनीक जमान्यात नाष्ट्यापासून ते जेवणापर्यंत सर्व पदार्थ चुटकीत हातात उपलब्ध होताता. मात्र, तयार खाद्यपदार्थांना ग्लॅमर रूप आले आहे. तरीही जुन्या खाद्यपदार्थांना एक वेगळीच चव असते असे म्हटले जाते. असेच मुंबईतल्या शिवडी येथील श्री विठ्ठल वडे वाले हे पारंपरिक पद्धतीने 64 वर्षांपासून (चुलीवर) भट्टीवर वडा बनवतात. मुंबईतला वडापाव जगभरात अनेक ठिकाणी मिळतो. परंतु, चुलीवरचा वडा हा मुंबईतल्या फक्त शिवडी याच ठिकाणी मिळतो आणि लोकं तिथे तो खाण्यासाठी आवर्जून गर्दी करतात.
शिवडीच्या एका कोपऱ्यात 1955 पासून चुलीवर म्हणजेच भट्टीवर बटाटा वडा तयार केला जातो. शिवडीचा भट्टी वडा म्हणून तो सर्वपरिचित आहे. मूळचे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विठ्ठल शिंदे यांनी 1950 च्या दशकात शिवडी कोळीवाडा परिसरात चहा व वडा याची फिरतीवर विक्री सुरू केली. शिवडी हा परिसर व्यवसायिक आणि विविध कंपन्या असलेला परिसर यात लोकांना अवेळी चहाची तलफ व भूक लागली की ते शोधणे अडचणीचे होते. त्यामुळे या विठ्ठल शिंदे यांना एका व्यावसायिकाने दुकानात बसण्यास जागा दिली. 1955 सालापासून सुरू झालेला हा भट्टीवडा आजतागायत 64 वर्ष सुरुच आहे. आज विठ्ठल शिंदे नाहीयेत परंतु त्यांची तिसरी पिढी म्हणजेच त्यांची मुले दत्तात्रय शिंदे हे हा वड्याचा व्यवसाय चालवत आहेत. लोक भट्टी वडा खाण्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणाहून याठिकाणी येतात.
भट्टी वड्याचे विशेष म्हणजे बटाटे उकडण्यापासून ते आतमधील सारण तयार करण्यापर्यंत सर्व गोष्टी या चुलीवरच केल्या जातात. मुंबईत इतरत्र मिळणार्या कुठल्याही वड्यापेक्षा इथला वडा जरा जास्त चविष्ट आहे, असे लोक सांगतात. श्री विठ्ठल वडे यांच्या दुकानात बटाटा वडा, समोसा आणि तळलेली मिरची वड्या सोबतच इतर पदार्थही चवीला स्वादिष्ट आहेत. इथल्या वड्याचा आकार लहान आहे. पण तळण्यासाठी वड्याचे सारण झाकले जाईल एवढ्या जाडीच्या पिठाचा थर त्यावर चढवला जातो. पिठात सोडा टाकला जातो. पण वडा तेलाला चिकटणार नाही अशा प्रकारे बनवला जातो. या वडापावमध्ये डाळ वडा देखील टाकला जातो व मिर्ची या सोबत खायला मिळते. हे पाहाताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटते.
या वडापाव सोबत तीन प्रकारच्या चटण्या दिल्या जातात. ओले खोबरे, चण्याची, लसूण व हिरवी मिर्ची वाटून तयार केलेला खर्डा आणि लसूण शेंगदाणे लाल मिर्ची पावडर यांची सुकी चटणी मिळेते. गोड चटणी नावाचा प्रकार इथे मिळत नाही. हा वडापाव पंधरा रुपयाला मिळतो.