मुंबई - सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचीही चौकशी करावी, असा रेटा विरोधकांनी लावून धरला आहे. मात्र कोणत्याही यंत्रणांनी चौकशी करा. आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते अनिल परब यांनी दिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाजवळ स्फोटके ठेवलेली कार आढळून आली होती. यामध्ये कारमालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
चौकशीला तयार-
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्यावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी वाझे यांचे त्यावेळी जोरदार समर्थन केले होते. एनआयएने वाझे यांना आता अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे विरोधीपक्षांनी वाझे यांची पाठराखण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली आहे.