मुंबई - आंदोलनातून भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने काढता पाय घेतला, असा आरोप जर करणार असाल तर पुन्हा एकदा आझाद मैदानात आम्ही आंदोलनाला बसू, असा इशारा राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. गेल्या 20 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यभर सुरू आहे. या आंदोलनाचा केंद्रबिंदू आजाद मैदान येथे असून येथे राज्यभरातून आलेले एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
'संपातून पळून गेले' असा आरोप करणार असाल तर पुन्हा संपावर बसू - प्रवीण दरेकर
आंदोलनातून भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने काढता पाय घेतला, असा आरोप जर करणार असाल तर पुन्हा एकदा आझाद मैदानात आम्ही आंदोलनाला बसू, असा इशारा राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घ्यावे. यासाठी राज्य सरकारने पगारवाढीचा तोडगा काढला. राज्य सरकारने पगारवाढीच्या दिलेल्या पर्यायाला आंदोलनाला समर्थन देणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देखील समर्थन दिले. मात्र त्यांनी समर्थन देऊनही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम राहिल्याने अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप अर्ध्यावर सोडून भारतीय जनता पक्षाचे आमदार गेले असल्याचा आरोप केला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि संपातून तोडगा निघावा यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारच्या पर्यायाचे समर्थन केले. मात्र आंदोलनातून भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने काढता पाय घेतला असा आरोप जर करणार असाल तर पुन्हा एकदा आझाद मैदानात आम्ही आंदोलनाला बसू, असा इशारा पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. विधान भवन तेथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
नेतेमंडळी एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानाची भरपाई देणार का?
एसटी संपातून तोडगा निघावा यासाठी राज्य सरकार मनापासून प्रयत्न करत आहे. मात्र संप अजून चिघळावा यासाठी काही नेतेमंडळी एसटी कर्मचाऱ्यांना फूस लावत आहेत. बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याची इच्छा असूनही नेतेमंडळीच्या आडकाठी भूमिकेमुळेच ते कामावर परत येऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे केवळ एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे संपाबाबत चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेतेमंडळी एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देणार का? असा सवाल परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.