मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या ७ जूनपासून ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार असल्याचा आदेश काल ४ जूनला मध्यरात्री जारी करण्यात आला असून अशा गुंतागुंतीच्या परिपत्रकामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता ढोबळ पद्धतीने काढलेले हे परिपत्रक आहे, अशी टीका विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
'पॉझिटिव्हीटी रेट, ऑक्सिजन बेड्सची संख्या या निकषांचा मेळ बसत नाही'
महाराष्ट्र ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. टप्पे पाडले असले आणि त्यासाठी निकष ठरवले असले तरी त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट, ऑक्सिजन बेड्सची संख्या या निकषांचा मेळ बसत नाही. मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीही विसंगतीपूर्ण नियमावली तयार केली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीत या नियमावलीचा पूर्ण फज्जा उडण्याची शक्यता असल्याकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले.