मुंबई -शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 37 आमदारांसह शिवसेनेत बंड पुकारले. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहू नये, असा निर्णय घेत त्यांनी गोहाटी गाठली. भाजपसोबत सरकार (BJP Government ) स्थापन करावे, असा दबाव त्यांनी आपल्या पक्षावर टाकला. मात्र, असे करताना त्यांनी आपण अजूनही शिवसेनेतच (Shiv Sena) आहोत आणि शिवसेनेतच राहणार असा ही पवित्रा घेतला. उलट आपला गट मोठा असल्याने आपणच खरी शिवसेना आहोत. शिवसेनेवर आपला हक्क आहे. त्यामुळे आपल्या गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Balasaheb Thackeray) असे नाव मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे या नावाला आक्षेप घेतला गेल्याने आता केवळ शिवसेना या नावाने आपला गट वेगळा असेल. असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
वेगळ्या गटाला मान्यता नाही- कळसे
शिंदे गटाला शिवसेना म्हणून वेगळ्या गटाची मान्यता मिळू शकत नाही. एखाद्या पक्षातून दोन तृतीयांश आमदार जरी फुटले आणि त्यांनी वेगळा गट स्थापन केला, तरी त्या गटाला कोणत्याही मान्यताप्राप्त पक्षात विलीन व्हावेच लागते. अन्यथा या आमदारांची पात्रता कायद्यानुसार रद्द होऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे. याबाबत शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी पूर्णतः हा विचार न करता बंडखोरी केली असावी. त्यामुळे त्यांना आता कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, असे मत विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी व्यक्त केले. कोणत्याही आमदारांच्या गटाला विधीमंडळात स्वतंत्र गट म्हणून बसता येणार नाही. आधी मान्यताप्राप्त पक्षात प्रवेश केला, तरच पक्षांतरबंदी कायद्यातून सुटका होऊ शकते. अन्यथा पक्षांतरबंदी कायद्यानुसार हे सर्व आमदार अपात्र ठरू शकतात. त्यामुळे या आमदारांना एकतर भाजपामध्ये किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल, असेही कळसे म्हणाले.
भाजपात विलीन झाल्यास आमदारांची गोची