मुंबई - मुंबईत नेहमीच आगी लागण्याच्या घटना घडतात. अशाच आगी रुग्णालयातही लागल्या आहेत. त्यानंतर रुग्णालयांचे अग्निसुरक्षा ऑडिट करण्यात ( Private Hospital Fire Audit ) आले. अग्निशमन प्रतिबंधक नियमांचे ( Non-compliance With Fire Prevention Rules ) नोटिस बजावूनही पालन न केल्याने मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांविरोधात कायदेशीर कारवाई ( Legal Action On 24 Private Hospitals ) केली जाईल, अशी माहिती अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कायदेशीर कारवाई होणार -काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील भांडुप येथील सनराईज रुग्णालयात ११ जणांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनांनंतर मुंबईतील सर्व रुग्णांलयांची पाहणी करून नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. पालिकेच्या तपासणीत अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या ६६३ रुग्णालयांना पालिकेने नोटीस बजावली होती. यावेळी नोटिशीनंतर ६३९ रुग्णालयांनी अग्नी प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित केली आहे. तर २४ खासगी रुग्णालयांना त्रूटी दूर करण्यासाठी १२० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीत संबंधित रुग्णालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या २४ रुग्णालयांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कोर्टात त्यांच्या विरोधात दावे दाखल केले जातील, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.