मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि लसीकरणाची गति वाढवण्यासाठी राज्य सरकार सोबतच मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पुढचे पाऊल टाकले आहे. मुंबई महानगरपालिकेने "लसींसाठी जागतिक निविदा काढली आहे. अशा प्रकारे निविदा काढणारी मुंबई महापालिका ही जगात पहिली महापालिका ठरली आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावर आता विरोधी पक्ष भाजपाने शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, 'महाविकास आघाडी सरकार ग्लोबल टेंडरकरता केंद्राकडे परवानगी मागते आहे. त्याचवेळी महापालिकेला स्वतः मंजुरी देतेय? यांचे गौडबंगाल काही कळत नाही! जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का?' असा सवाल उपस्थित करत या जागतिक निविदेवर टीका केली. तसेच मुंबई महापालिकेची ही निविदा म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी जो बागुलबुवा करत आहे, तो अतिशय निषेधार्ह असल्याची टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
तीन आठवड्यात लस देणे अनिवार्य-
महापौर किशोरी पेडणेकर यांनी, "लसींसाठी (ग्लोबल टेंडर) जागतिक निविदा काढणारी मुंबई महापालिका जगात पहिली ठरली आहे. याची अंतिम तारीख ही १८ मे असून, आदेश निघाल्यानांतर संबंधित कंपन्यांना कमीत कमी ३ आठवड्यांच्या आत लस द्याव्या लागतील. त्यांना आयसीएमआर आणि डीसीजीआयची मार्गदर्शक तत्वे देखील पाळावी लागतील", असं नमूद केले आहे. तसेच, आवश्यक असल्यास कंपन्यांनी त्यांचे शीतगृह स्थापन करावे. मात्र, लसींची कार्यक्षमता आमच्या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये दिल्यानुसार ६०% पेक्षा कमी नसावी. या सर्व प्रक्रियेसाठी कोणालाही आगाऊ देय मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
टेंडरच्या मागे काय गौडबंगाल-
लसीच्या खरेदी निविदेनंतर शिवसेना-भाजपा आमने सामने आल्याचे दिसून येत आहे. मुंबईला जागतिक निविदा काढूनही लस मिळाली नाही तर ते अपयश केंद्राचे असेल, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. यावर भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. ग्लोबल टेंडरच्या मागे काय गौडबंगाल आहे, याचा विचार केला पाहिजे, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
"जगात आजही भारतात बनणाऱ्या कोव्हॅक्सिनआणि कोव्हीशिल्ड या दोन लसींना मागणी आहे. मग असं असताना, तुम्ही ग्लोबल टेंडरच्या मागे का धावता?" असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे. "रशियाच्या स्पुटनिक लसीलाही केंद्राने परवानगी दिली आहे ती लस भारतातच आहे. लोकांना दाखवण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी ग्लोबर टेंडरच्या नावाखाली जो बागुलबुवा उभा करताय, तो अतिशय निषेधार्ह आहे" असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. "देशातील जे लस उत्पादक, वितरक आहेत, त्यांना विश्वासात घेऊन काम केले, तर मुंबई, महाराष्ट्राचा प्रश्न सुटेल" असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.