मुंबई -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाहीत, असा भोंगळ कारभार एमपीएससी आयोगात सुरू असल्याची टीका विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात भाजपाचे सरकार असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आम्ही स्वायत्तता दिली, मात्र आता या स्वायत्ततेचा स्वैराचार केला जातो आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे.
'दोन-दोन वर्ष मुलाखती होत नसल्याने तरुणांमध्ये निराशा'
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्नील सुनील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कार्यप्रणाली पाहता त्याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात अनेक जागा रिक्त आहेत. मात्र त्या जागा अद्यापही भरल्या गेलेल्या नाहीत असेही त्यांनी सांगितले. राज्यातले तरूण मोठ्या आशेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असतात. मात्र दोन-दोन वर्ष मुलाखती होत नसल्याने तरुणांमध्ये निराशा येत असल्याची त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
सरकार मोर्चेकऱ्यांच्या भावना कशा थांबवणार?
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत. राज्य सरकारकडून या मोर्चेकऱ्यांना थांबवले जात आहे. मात्र राज्य सरकार मोर्चेकऱ्यांना थांबवू शकते, त्यांच्या भावना कशा काय थांबवू शकेल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. लोकांकडून मोर्चे काढले जातात याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असताना राज्य सरकार केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्यात गुंग आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.