मुंबई -मुंबई महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीआधी भाजपाने त्यांचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून यावेत म्हणून वॉर्डांची पुनर्रचना केली आहे. ही वॉर्ड पुनर्रचना रद्द करून २०२२च्या महापालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा नव्याने वॉर्डांची पुनर्रचना करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. तसेच आगामी निवडणुका आघाडी करून की स्वबळावर लढवायच्या याचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील, अशी माहिती रवी राजा यांनी दिली.
'पत्र देणार'
मुंबई महापालिकेच्या २०१२मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे ३२ नगरसेवक निवडून आले होते. २०१४मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर भाजपाचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्याकडून आपल्याला हवी तशी वॉर्डची पुनर्रचना करून घेतली आहे. याचा फायदा भाजपाला झाला. भाजपाचे ३२ वरून ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. यावरून ५० वॉर्डमध्ये आपले नगरसेवक निवडून यावेत म्हणून वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली, असे स्पष्ट होत आहे. यामुळे ही वॉर्ड पुनर्रचना रद्द करून नव्याने पुनर्रचना करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. तसे पत्र मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, महसूल मंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडी की स्वबळावर?
मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवाव्यात, अशी अपेक्षा काही काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना, काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी नुकताच आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुंबईमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यानी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. ही मागणी पाटील यांनी पक्ष श्रेष्ठींकडे पोहोचवली आहे. निवडणुका स्वबळावर लढवायच्या की आघाडी करून लढवयाच्या याचा निर्णय पक्षाचे दिल्ली, महाराष्ट्र येथील नेते तसेच मुंबई अध्यक्ष घेतील. त्याची आम्ही अंमलबजावणी करू, असे त्यांनी म्हटले आहे.