मुंबई - 'एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, त्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे', हा निंदनीय प्रकार असून मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाडांना बडतर्फ करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सामान्य माणसांवर अन्याय झाला, तर त्याविरुद्ध आवाज उठवणे गैर नाही. न घाबरता प्रत्येकाला मत मांडता आले पाहिजे, असे ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा; फडणवीसांची मागणी - jitendra avhad news
'एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, त्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे', हा निंदनीय प्रकार असून मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाडांना बडतर्फ करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नुकतेच जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मारहाण झाल्याने एका तरुणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट केले आहे.
सोशल मीडियाचा एखाद्याने चुकीचा वापर केल्यास त्याविरोधात तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण शासनकर्तेच मारहाण करत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचं आवाहन केलं होतं. मोदी यांनी हे आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. आव्हाड यांनी आपली भूमिका ट्वीट करून प्रसिद्ध केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर पीडित तरुणाने आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यांनतर आव्हाडांच्या सांगण्यावरून दोन पोलिसांनी घरात घुसून आव्हाडांचा बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याचे संबंधित तरुणाने सांगितले. यानंतर संबंधिताने आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली; आणि हे प्रकरण चर्चेस आले. सर्वच स्तरांवर आव्हाडांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी केलीय.