मुंबई -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सतिष उके यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मार्च महिन्यात अटक केली होती. सतीश उके यांनी गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टामध्ये ईडीविरोधात आरोपपत्रामध्ये फेरबदल केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कोर्टासमोर केली. जमीन गैरव्यवहारात मनी लाँड्रींगप्रकरणी सतीश उके प्रकरणात हा मोठा गौप्यस्फोट आहे.
सतीश उकेंच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात 2 तक्रार अर्ज दाखल -ईडीकडून उके प्रकरणात दाखल चार्जशीटमध्ये फेरबदल केल्याचा आरोप सतीश उके याचे वकील अॅड. रवी जाधव यांनी केला आहे. या संदर्भात उकेंच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात 2 तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जानंतर न्यायालयाने संबंधित चार्जशीट सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेते, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते सातत्याने आवाज उठवत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलणारे ते नागपुरातील पहिले वकील आहेत.