मुंबई - आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती (Lata Mangeshkar Birth Anniversary) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण (PM Modi Remember Lata Mangeshkar) केले. गानप्रतिभेचे सर्वोच्च वरदान लाभलेल्या लता मंगेशकरांना गानकोकिळा असे म्हटले जाते. अष्टपैलू गायकांमध्ये नावाजल्या गेलेल्या लतादीदी चमचमत्या सिताऱ्यांपैकी एक होत्या. आपल्या आवाजाने त्यांनी श्रोतृवृंदाला कायमच आपलेसे केले, त्यामुळे जगभरातून त्यांचा चाहतावर्ग निर्माण झाला.
लतादीदी यांचा जीवनप्रवास -लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदौर येथे झाला. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. दीनानाथ मंगेशकर त्यांचे वडील तर आईचे नाव शुद्धमती असे होते. मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ अशी त्यांची भावंडे जे आज घडीला नावाजलेले संगीतकार आणि गायक आहेत. त्याकाळी वडील पं. दीनानाथ यांनी लतादीदींना अगदी लहान असतानाच संगीताचे धडे देण्यास सुरू केले. मात्र, दरम्यानच्या काळात वडील गेले आणि सारी जबाबदारी त्यांच्यावर पडली. लतादीदी त्यावेळी गाण्याचे कार्यक्रम करीत असत. आपल्या गानप्रतिभेच्या जोरावर त्या पुढे आल्या आणि संगीताच्या एका युगावर आपले नाव कोरले.