मुंबई -गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ). त्या 92 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर बंदुकीच्या फैरींची सलामी देत लतादीदींना अखेरचा निरोप देण्यात आला.
अंत्यसंस्काराला दिग्गजांची हजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, कैलाश खेर, आमीर खान, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आदींसह सामाजिक, राजकीय, कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी लता मंगेशकरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदरांजली वाहिल्यानंतर मंगेशकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पंतप्रधानांनी ह्रदयनाथ मंगेशकर, आशा भोसले यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा मंत्री आदित्य ठाकरे यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. अधिकाऱ्यांनी दिली मानवंदना
याआधी लतादीदींचं पार्थिव १२.३० च्या दरम्यान 'प्रभू कुंज' या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं. त्यानंतर सैन्य दल, नौसेना, वायुसेने दलातील शिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली. दुपारी ३.३० च्या सुमारास लता मंगेशकर यांचे पार्थिव त्यांचे निवासस्थान असलेल्या प्रभुकुंज येथून शिवाजी पार्ककडे रवाना करण्यात आले. ५.३० च्या सुमारास पार्थिव शिवाजी पार्क मैदानावर पोहोचले. तेथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. 'लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला,' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अवयव निकामी झाल्यानं निधन
अवयव निकामी झाल्यानं त्यांचं आज सकाळी ८.१२ वाजता निधन झालं अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. पत्रकारांशी संवाद साधता बरीच कॅण्डी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी म्हणाले की, लता दीदी (लता मंगेशकर) यांचे आज सकाळी ८.१२ वाजता निधन झाले. त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झालेलं होते. त्यांच्यावर बराच काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. ते म्हणाले की, ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर डॉ. प्रतित समदानी आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.
अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन केंद्राकडून दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा
लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र, आज सकाळी पाऊने दहाच्या सुमारास लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतातील एका युगाचा अंत झाला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला. भारतरत्न लताजींचे कर्तृत्व अतुलनीय राहील. आज दैवी वाणी कायमची शांत झाली आहे. पण, तिचे सुर अमर राहतील, चिंरतर गुंजत राहतील.