मुंबई - कोरोनाचा बिमोड करण्यासाठी मोफत लसीकरण केले जाणार आहे. सरकारच्या या उपक्रमासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांनी सात लाख रुपयांची मदत दिली आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन-
कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत राज्य शासनास आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी कोविड-१९ मुख्यमंत्री सहायता निधी स्थापन करण्यात आला आहे. या विशेष निधीसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडूनही मदत प्राप्त झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या निधीत मदत देऊन कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केले आहे.
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज बाधित होणाऱ्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, राज्य सरकारने जनतेच्या जीवाला प्राधान्य देत राज्यात सध्या लॉकडाऊन लागू केला. गेल्या वर्षभरापासून राज्य कोरोना महामारीचा सामना करत आहे.
या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी राज्यसरकारने 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. तरीही राज्य शासनाच्या वतीने आरोग्य सुविधांसाठी प्राधान्य देऊन मोठा निधी खर्च केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अनेक जणांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
या देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.