मुंबई- एकेकाळी अॅम्बेसिडर गाडी सरकारी अधिकाऱ्यांची शान होती. आता आधुनिकतेचा काळात अॅम्बेसिडर गाडी शासकीय कार्यालयातून काळाच्या पडद्याआड गेली आहे. रेल्वेच्या मुंबई विभागातील शेवटची अॅम्बेसिडर गाडी ३५ वर्ष सेवा देऊन आज सेवा निवृत्त झाली आहे. विशेष म्हणजे, अॅम्बेसिडर गाडीबरोबर या गाडीचा चालक सुद्धा निवृत्त झाला. मध्य रेल्वेची शेवटची अम्बेसिडर गाडी म्हणून आज निरोप देण्यात आला. यावेळी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. तसंच गुलाब पुष्पांचा वर्षाव करून ढोल ताशांच्या गजरात रेल्वे अधिकाऱ्यांनी परंपरेप्रमाणे गाडी ओढत अॅम्बेसिडर गाडीला आणि चालकाला निरोप दिला.
१६ वाणिज्य व्यवस्थापकांनी दिली सेवा - १९६० आणि १९७० च्या दशकात हिंदुस्थान अॅम्बेसिडर या चार चाकी गाडीने अनेकांच्या मनावर राज्य केले होते. अॅम्बेसिडर सर्वात लोकप्रिय गाडीपैकी एक होती. ही चार चाकी गाडी राजकीय नेत्यांपासून ते उद्योगपती, अभिनेते, प्रसिद्ध व्यक्तींनाही आवडायची. अनेक वर्षांपासून या गाडीने अनेकांच्या मनात स्थान मिळवले होते. विशेष म्हणजे रेल्वे अधिकाऱ्यांच्या सेवेत शासकीय कार्यलयात हिंदुस्थान अॅम्बेसिडर चारचाकी गाडी असायची. मात्र, हळूहळू गाडी आता इतिहासात जमा होत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील शेवटची अॅम्बेसिडर गाडी आज निवृत्त झाली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक एमएफए -7651 अॅम्बेसिडर चारचाकी गाडी २२ जानेवारी १९८५ ला रेल्वेचा सेवेत दाखल झाली होती. तेव्हा, या गाडीचे चालक मुतु पांडी आंडी नडार हे होते. तेव्हापासून मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापकाच्या सेवेत अँम्बेसिडर गाडी होती. ३५ वर्षांच्या सेवेत आतापर्यत १६ वाणिज्य व्यवस्थापकांनी या गाडीतून प्रवास केला आहे. विशेष म्हणजे या शेवटच्या अॅम्बेसिडर गाडीचे चालक गेली ३५ वर्ष मुतु पांडी आंडी नडार हेच आहेत.