मुंबई:लालबागच्या राजाचीस्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. सध्या ज्या ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात येते तेथे कोळी व इतर व्यापारी बंधूनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती झाली त्यामुळे तेथे उघडयावर भरणारा बाजार इ.स. १९३२ बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरुपी बांधण्यात आला. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही. बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु. ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रुपात श्रीची स्थापना करण्यात आली होती तेव्हा पासून नवसाला पावणारा लालबागचा राजा (The wish fulfilling Raja of Mumbai Lalbaug) म्हणून मूर्ती प्रसिद्ध झाली.
राजाचा इतिहास : लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्ती करीता जनजागृती व्हावी यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. तोच उद्देश त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी समोर ठेवून धार्मिक कार्याबरोबरच समाज जागृती करण्याचे काम हाती घेतले. सन इ.स. १९३४ ते इ.स. १९४७ या स्वातंत्र्यपूर्व काळात याठिकाणी विविध नेत्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत. त्यावेळी शंकरराव देव, कामगार नेते भाई डांगे, एस.एम.मिरजकर, भाई जगताप, हिंदुत्वनिष्ठ अनंतराव गद्रे, मुंबई काँग्रेसचे पुढारी एस. के. पाटील, गो. बा. महाशब्दे, भुलाभाई देसाई अशी राष्ट्रीय विचारसरणीची मंडळी येथे व्याख्याने देऊन जनजागृती करीत असत.
मूर्तीचे वैविध्यपूर्ण स्वरूप :त्याकाळात मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे देत असे. इ.स. १९४६ सालची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात इ.स. १९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्यावर्षी मंडळाने पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात गणरायाची मुर्ती बैलगाडीत विराजमान झालेली दाखविली होती. इ.स. १९४८ महात्मा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा त्यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारण्यात आले होते असे सांगितले जाते.
मंडळाच्या कार्याचे स्वरूपइ.स. १९४७ सालानंतर मंडळाच्या कार्याची रुपरेषा बदलण्यात आली. मंडळाने मग राष्ट्रउभारणीच्या कार्यात हातभार लावण्याला प्राधान्य दिले. मंडळाच्या शिल्लक निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात छोटा वाटा उचलला. नंतर देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे सादर होऊ लागले.
रौप्य महोत्सव साजरा इ.स. १९५८ साली मंडळाने पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव साजरा केला. त्यावेळी `गीता उपदेश' आणि `कालियामर्दन' हे दोन देखावे पाच-पाच दिवसांनी सादर केले. हे देखावे अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. रौप्य महोत्सवी वर्षाच्या गणेशोत्सवाच्या व्याख्यानमालेत मुंबई राज्याचे मंत्री नामदार म. ल. पाटील, ना. गणपतराव तपासे, ना. गोविंदराव आदिक, ना.मालोजी निंबाळकर, म्यु.कार्पोरेटर डॉ.नरवणे, गोविंदराव महाशब्दे, वसंतराव काटे, कामगार सेवा सदनचे गोवर्धनदास मपारा, काकासाहेब तांबे आदींची व्याख्याने झाली.