मुंबई- ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग माझ्या हातात आहे. त्यानुसार आम्ही सरकार चालवत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटले की, उद्धव यांच्या हातात स्टिअरिंग आहे. मात्र, मागे बसलेले ठरवतात कुठे जायचं असतं? त्यानुसार तिघेही वेगवेगळ्या दिशेने भूमिका घेत असल्याचे दिसतात. तीन चाकी ऑटोरिक्षामध्ये बसलेल्यांना सवारीनुसार जावं लागतं. सध्या रिक्षाची परिस्थिती काय? त्याची दिशा कुठे आहे? काही कळत नाही, असा चिमटा फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला आहे.
आज भाजप कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पहिल्यांदाच बैठक घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांची मतं जाणून घेतली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजप पक्ष कोरोनाकाळात कशाप्रकारे काम करत आहे याची माहिती राष्ट्रीय अध्यक्षांना दिली. तसेच कशाप्रकारे काम करायला हवं याचं मार्गदर्शन पक्षश्रेष्ठींकडून आम्ही घेतले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीने सरकार चालवून दाखवावे. आम्हाला हे सरकार पाडायचं नसून, आम्ही विरोधातच आहोत. लोकांचं लक्ष उडवण्यासाठी म्हटलं जातंय की, हे सरकार पाडत आहेत. तुमचं सरकार एकमेकांच्या अंतर्गत विरोधामुळे पडेल. तोपर्यंत आम्ही जनतेची सेवा करू. आमचं जीवन संघर्षाचं आहे. आम्ही तुम्हाला मदत करतो, जिथे चुकतंय ते दाखवणं हे आमचं कर्तव्य असल्याचे फडणवीस म्हणाले.