मुंबई -चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनचा (डिजिटल) माजी कर्मचारी क्षितीज प्रसाद याला विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप आणखी एक खटला सुरू असल्याने ते आज तुरुंगातून बाहेर पडणार नसल्याची माहिती मिळत आहे. या खटल्याची सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. क्षितीज रवि प्रसाद याला विशेष एनडीपीएस कोर्टाने 50 हजार रुपयांच्या वयक्तिक बाँडवर जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याचा पासपोर्टही जमा करण्यात आलाय.
ड्रग्ज प्रकरण : क्षितीज प्रसादला जामीन मिळाल्यानंतरही अद्याप तुरुंगातच क्षितीजला ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. सुशांत प्रकरणातील तपासादरम्यान हे ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. यापूर्वी क्षितीज प्रसादचे वकील सतीश मनेशिंदे यांनी क्षितीजला करण जोहरचे नाव घ्यायला भाग पाडल्याचा आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर केला होता. एनसीबीने मात्र हे आरोप निराधार असल्याचे सांगितले.
हेही वाचा - 'आश्रम' वेब सिरीजच्या तिसऱ्या सिझनची बॉबी देओलला प्रतीक्षा
काय आहे प्रकरण?
एनसीबीने दावा केला होता की, क्षितीज प्रसाद अनेक ड्रग सप्लायर्सच्या संपर्कात होता आणि तो स्वतःही ड्रगचे सेवन करत होता. यामुळेच त्याला अटक झाली होती.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या एनसीबीकडून (अमली पदार्थ नियंत्रक विभाग) गेल्या काही दिवसांपासून करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितीज प्रसादची चौकशी केली जात होती. या पथकाकडून क्षितीज प्रसादच्या मुंबईतील वर्सोवा, अंधेरी स्थित घरावर छापा सुद्धा मारण्यात आला होता. यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. क्षितीज प्रसादची चौकशी केल्यानंतर त्यास एनसीबीने अटक केली होती.
क्षितीजने चौकशीत मान्य केले आहे, की त्याचे संबंध अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अंकुश अरेंजासोबत होते. क्षितीज प्रसादच्या मुंबईतील व दिल्लीतील घरी असलेल्या पार्ट्यांमध्ये अंकुश अरेंजा देखील हजर असायचा. एनसीबीने अंकुश अरेंजालाही अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती.