मुंबई - कोकण शिक्षक मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले माजी शिक्षक आमदार रामनाथ दादा मोते यांचे आज सकाळी 7 वाजता निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्यावर दुपारी १२ च्या सुमारास ठाण्यातील दादोजी कोंडदेव समोरील जवाहर बाग स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून मोते यांच्यावर ठाण्यातील फोर्टिस रुग्णालयात डायलेसिस आणि इतर उपचार सुरू होते. त्यातच त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांच्यावर करण्यात आलेल्या डायलेसिसनंतर त्यांच्या शरीराने प्रतिसाद न दिल्याने त्यांचे निधन झाले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नावर मोते हे अत्यंत अभ्यासू प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी तब्बल ४२ वर्षे शिक्षण चळवळ आणि शिक्षक व शिक्षकेतरांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. मोते यांनी लाखो शिक्षकांचे प्रश्न त्यांनी सोडवले होते. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतरांचा मायबाप आज सोडून गेल्याची भावना शिक्षक, शिक्षकेतर आणि मुख्याध्यापकांमध्ये व्यक्त होत आहे.
रामनाथ मोते हे कोकण शिक्षक मतदारसंघातून दोन वेळा आमदार असूनही उल्हासनगरच्या महात्मा गांधी रोडवर असलेल्या एका चाळीत त्यांचे दत्त निवास हे घर हीच त्यांची मालमत्ता राहिली. आयुष्यभर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी वाहून घेतलेल्या मोते सरांनी आपली कोणती शिक्षण संस्था, गडगंज संपत्ती गोळा करण्याचा मोह केला नाही. रोज सकाळी ७ वाजता कल्याण येथील शिक्षक परिषदेच्या कार्यालयात त्यांचा शिक्षक दरबार भरत होता. यासाठी राज्यभरातून शिक्षक, शिक्षेकतर, मुख्याध्यापक आदी आपले प्रश्न घेऊन येत असत. तेथूनच राज्यातील लाखो शिक्षकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते.
विधानपरिषदेतील उत्कृष्ठ वक्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. मोते राज्य विधानमंडळाच्या आश्वासन समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते. आश्वासन समितीचे सर्वात चांगले अहवाल विधानमंडळाला सादर केले होते. विधानमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात १०० टक्के उपस्थिती लावण्याचा विक्रम केला होता. उत्कृष्ठ संसदपटू म्हणून त्यांचा तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सत्कारही झाला होता.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला नावारुपाला आणण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले होते. परंतु, परिषदेतील राजकारणामुळे २०१७ मध्ये झालेल्या कोकण शिक्षक आमदाराच्या निवडणुकीत त्यांना एकाकी पाडून त्यांचा पराभव करण्यात आला होता. ही खंत त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत राहिली होती. राज्यातील लाखो शिक्षकांचा आधारवड, त्यांचे पाठीराखे होते. विधानमंडळापासून ते सरकारकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यांचे 'मी आमदार रामनाथ मोते बोलतोय' नावाचे २० हून अधिक खंड पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशित केले होते. त्याच्या ४० लाख प्रति या शाळा, आणि शिक्षकांपर्यंत पोहोचल्या होत्या.