मुंबई-राज्यातील राजकारणात उलथापालथ घडवून आणणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे 'लेटर बॉम्ब' प्रकरण हे नव्या टप्प्यावर पोहोचले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सीबीआय चौकशी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. तर याचिका फेटाळली गेल्याने राज्य सरकार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दणका बसला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे दिवसभरात राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्युत्तरांची धुळवड पाहायला मिळाली आहे.
सीबीआय चौकशी सुरूच राहणार, अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सीबीआय चौकशी होणार आहे. आरोपांचे स्वरूप पाहता स्वतंत्र एजन्सीद्वारे चौकशी आवश्यक आहे. ही लोकांच्या विश्वासाची बाब आहे, असे न्यायमूर्ती कौल यांनी निकालात म्हटले आहे.
न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. तर कपिल सिब्बल यांनी अनिल देशमुख यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली. राज्यातील उच्च अधिकारी या प्रकरणात सामील आहेत. ही तपासणीची बाब आहे, असे न्यायमुर्ती गुप्ता सुनावणीदरम्यान म्हणाले. अनिल देशमुख आणि परमबीर सिंग दोघांनीही जवळून काम केले. दोघेही प्रतिष्ठित पदी होते. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशी गरजेची आहे, असे न्यायामुर्ती कौल निकालात म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत- फडणवीस
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका फेटाळण्याच्या निकालाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. सीबीआय चौकशी करत आहे. त्यामुळे सर्व सत्य बाहेर येणार असल्याचा दावा केला आहे.
माजी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ज्या प्रकारचे गंभीर आरोप झालेले आहेत,त्या अनुषंगाने सीबीआय चौकशी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट निर्देश दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाची आजची टिपणी अत्यंत महत्त्वाची आहे. खरे पाहिले तर महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयात जायची गरज नव्हती. मात्र तरीही ते गेले. सीबीआय चौकशी करत आहे त्यामुळे सर्व सत्य बाहेर येणार असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे
हेही वाचा-LIVE Updates : सचिन वाझे प्रकरणाचे ताजे अपडेट्स; काडीचाही संबंध नसल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा दावा
भाजप उद्या जात्यात आल्याशिवाय राहणार नाही-हसन मुश्रीफ
मुंबई- भाजप तसेच विरोधी पक्षनेते केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून हे सर्व कट कारस्थान करत असल्याचा आरोप ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. सचिन वाझे यांच्या कथित पत्रात थेट अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या त्या आरोपानंतर पत्रकारांसमोर त्यांनी आपली बाजू देखील मांडली. मात्र, कथित पत्रात पत्रातून अशाप्रकारे आरोप करणे ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आज जरी सुपात असला तरी उद्या जात्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.
सचिन वाझे यांच्या कथित पत्रानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. बुधवारी (दि. 7 एप्रिल) अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रामध्ये करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, तुरुंगात बसून असे लेटर बॉम्ब टाकण्याची ही कुठली पद्धत आहे, भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी हे सर्व करत असल्याचा आरोप ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तुरुंगात बसून अशाप्रकारे कोणी पत्र लिहीत असेल तर, कोणत्याच सरकारला काम करता येणार नाही, असेही ते माध्यमांसमोर म्हणाले.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयात सत्याचा विजय झाला- चंद्रकांत पाटील
सर्वोच्च न्यायालयात सत्याचा विजय झाला- चंद्रकांत पाटील
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका फेटाळण्याच्या निकालाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. ते प्रतिक्रिया देताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला ही चपराक लगावली आहे. गेल्या दीड वर्षापासून "हम करे सो कायदा" ही नीती सरकार वापरत असल्यामुळे सरकारला असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यासारख्या लोकांनीच सरकारमध्ये बसून ही वसुली सुरू केली आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सरकारची याचिका फेटाळलेली आहे.
सचिन वाझे हे तर महाविकास आघाडीला प्रिय होते-चंद्रकांत पाटील
मुंबई- सचिन वाझे प्रकरणावरून पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आगामी 15 दिवसात सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल, असे म्हटले आहे. क्रिकेटमध्ये जसे सुरुवातीचे दोन फलंदाज बाद व्हायला वेळ लागतो. त्यानंतर पुढचे फलंदाज हे पटापट ढेपाळतात असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावला.
सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावरती पत्र लिहून आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याविषयी शंका उपस्थित करत आहे. मात्र हेच सचिन वाझे कालपर्यंत सरकारला प्रिय होते. अधिवेशनाचा एक मिनिटही बहुमूल्य असतो. मात्र याच सचिन वाझे यांना पदावरून दूर करण्यासाठी अधिवेशन नऊ वेळा तहकूब करावे लागले , असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले
वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
पंढरपूर (सोलापूर) - सचिन वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नसताना आपले नाव घेतले जात आहे. त्याबाबत आपल्याला हसू येते. या प्रकरणावर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे का, याबाबत चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करण्यात आला.. त्यानंतर उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.
सचिन वाझे आणि अनिल परब यांचे संवाद एनआयकडे, नितेश राणेंचा गौप्यस्फोट
सिंधुदुर्ग - सचिन वाझे आणि अनिल परब यांचे संवाद आणि टेलिग्रामचे चॅट एनआयकडे असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार प्रहार करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जो नियम अजित पवार, अनिल देशमुख व अशोक चव्हाण यांना लागला तोच नियम अनिल परब यांना लागू होऊन त्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. उद्या तोंड काळ होण्यापेक्षा आजच राजीनामा दया आणि चौकशीला सामोरे जा, असेही ते म्हणाले.
वकील साहेब शपथेवर बोलणे हा गुन्हा आहे, मनसेचा अनिल परबांना टोला
मुंबई- परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्ब पाठोपाठ आता सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्ब मुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत वाझेचे आरोप फेटाळत आपल्या मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली होती. यावरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. वकील साहेब शपथेवर बोलणे हा गुन्हा आहे, हे आपल्याला माहित असेल ही अपेक्षा, असे ट्विट करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
सचिन वाझेंच्या कथित पत्रातील मजकून राज्य अन् पोलिसांची प्रतिमा मलीन करणारा - फडणवीस
नागपूर- महाराष्ट्रात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात वाझेचे कथित पत्र हे व्हायरल झाले आहे. हे पत्र सर्वांना विचार करायला भाग पडणारे असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणणे आहे. या पत्रातील मजकूर महाराष्ट्र व पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगला नाही. जे सत्य आहे ते पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. ते नागपूर विमानतळात माध्यमांशी बोलत होते.
काय आहे प्रकरण ?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त असताना आपल्याला अवैधरीत्या मुंबई मधील बार मालकाकडून 100 कोटी रुपये जमा करण्यात सांगितले. अशा प्रकारचे खळबळजनक पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. तसेच आपण केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, यासाठी परमबीर सिंग यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर, परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका केली होती.