मुंबई -अमरावतीचे खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( Mla Ravi Rana ) या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नवनीत राणांनी 'बाळासाहेब आमच्या वडिलांसारखे असून, श्रद्धास्थान आहेत. त्यांचे निवासस्थान आमच्यासाठी पवित्र आहे. म्हणून आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच,' अशी भूमिका घेतली. त्याला आता शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'यांनी तर आमच्या पक्षाचा बाप पण हायजॅक केला,' असा खोचक टोला पेडणेकर यांनी राणा दाम्पत्याला लगावला ( Kishori Pednekar Taunt Rana )आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, 'यांनी तर आमच्या पक्षाचा बापच हायजॅक केला. यांना स्वतःचा बाप नाही का? हे एका बापाचे आहेत की नाहीत? यांना स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा बाप हायजॅक करावा लागतोय ही यांची लायकी. दुसऱ्याच्या तालावर नाचणाऱ्या बाहुल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तुमच्यात खरंच हिंमत असेल तर या मातोश्रीवर. मातोश्री ही आमच्या बापाची आहे तुमच्या बापाची नाही. त्यामुळे बाप पण हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नका," असा थेट इशारा पेडणेकर यांनी दिला आहे.