मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांवरून पालिकेवर टीका केली जाते. पूर्व उपनगरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. या रस्त्यांची पाहणी करताना महापौरांनी संताप व्यक्त केला. या भागातील रस्त्यांवरील खड्डे आठ ते दहा दिवसात बुजविण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. रस्ते विभागातील अभियंत्यांना अतिरिक्त कामे देण्याच्या प्रकाराचीही चौकशी केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
मुंबई : खड्डे पाहून महापौरांचा चढला पारा; अधिकाऱ्यांना घेतले फैलावर - mumbai news
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत कुर्ला येथील जरीमरी मार्ग तसेच चेंबूर येथील सुभाष नगर मार्गाची पाहणी केली. पूर्व उपनगरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली असून, त्याची पाहणी करताना महापौरांनी संताप व्यक्त केला.
अधिकाऱ्यांना इतर विभागाचे काम
कुर्ला येथील जरीमरी मार्ग तसेच चेंबूर येथील सुभाष नगर मार्गाची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी २७ सप्टेंबर रोजी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर खड्डे पडणे समजू शकते. पण त्यानंतर पाऊस थांबल्यावर खड्डे बुजवणे हे आपले कर्तव्य आहे. गणपती विसर्जनानंतरही रस्त्यांची अशी स्थिती राहिल्यास ती गंभीर बाब आहे. खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र रस्ते अभियंता नियुक्त केल्यानंतरही त्यांना अतिरिक्त पदभार इतर विभागाचा देण्यात येत असल्यास ते चुकीचे आहे. संबंधित रस्ते अभियंत्यांना रस्त्याचे काम सोडून इतर कोणत्या विभागाचा चार्ज देण्यात आलेला आहे, याची स्वतंत्र चौकशी करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
रस्त्यांवरील खड्ड्यांची चौकशी
यावेळेस रस्त्यांवरील खड्ड्यांची उपायुक्त पायाभूत सुविधा तसेच प्रमुख अभियंता रस्ते यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी सहाय्यक अभियंता रस्ते यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे मेट्रोच्या कामामुळे ज्या ठिकाणी खड्डे दिसतील, तेथे मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी आणि ती समस्या सोडवावी.