मुंबई- टोमॅटो पिकावर आलेल्या अज्ञात विषाणूचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. बातमीची व तथ्यांची मोडतोड करून अफवा पसरवल्या जात आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.
किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले वनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसं आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसं आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे. संबंधितांनी ही बाब लक्षात घेऊन या बाबतच्या अफवा पसरवणे तातडीने थांबवावे, असे किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.
अफवा पसरवण्यासाठी शेतकरी कार्यकर्त्यांचे सोशल मीडियावर असलेले व्हिडिओ एडिट करून वापरले जात आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत असे आवाहन किसान सभेने केले आहे. टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभागाने काम सुरू केले आहे. बाधित झाडांचे नमुने बंगळुरू येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दोन दिवसात याबाबत निदान होईल, अशी अपेक्षा आहे.
कृषी विभागाने या निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून आजारावरील उपचाराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून द्यावे, असे आवाहन किसान सभा करत आहे. टोमॅटोवरील विषाणूच्या संसर्गाबाबत जागरूकता दाखवून आजाराच्या निदानाबाबत सक्रियता दाखविलेल्या शेतकरी कार्यकर्त्यांचे व हितचिंतकांचे किसान सभेने आभार व्यक्त केले आहे. कृषी विभागाने बंगळुरू येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेले विषाणूजन्य टोमॅटोचे नमुन्यांचे निष्कर्ष अद्याप प्रतीक्षेत आहेत.