मुंबई - कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सोमावरी मुंबईतून किसान पुत्र संघर्ष यात्रा दिल्लीला रवाना झाली आहे. या यात्रेत ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. ही यात्रा दिल्लीला शेतकरी आंदोलन सिंधू बॉर्डर ला जाईल व जाताना वाटेमध्ये सभा घेणार आहे, अशी माहिती कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली आहे.
'आंतरराष्ट्रीय पातळीवरचे समर्थन गोळा करू'
केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले अन्यायकारक 3 कृषी कायदे हे भांडवलदारांच्या फायद्याचे असून शेतकऱ्यांच्या शोषणाकरीता आणलेले आहेत, पण हुकूमशाही मोदी सरकार ते आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न करत आहे, शिवाय आंदोलकांना देशद्रोही अशी उपमा देत बदनाम करीत आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या आंदोलनात समर्थन देतात तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. केंद्र सरकारच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. तसेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रॅटिक युथ (WFDY)च्या वतीने येणाऱ्या काळात आम्ही जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पातळीवरचे समर्थन गोळा करू, असे रेड्डी म्हमाले.