मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांवर प्रवर्तन निर्देशनालयाने (ईडीने) राज्य सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी, ईडीने अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करायला उशीर केल्याचे म्हटले आहे. तसेच शरद पवार यांनी हा दोष ईडीला देऊ नये, याप्रकरणी सर्वांची चौकशी होणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले.
अजित पवार यांच्यावर अगोदरच सिंचन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून, आज ना उद्या कारवाई होणारच, असे सोमय्या म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्य सहकारी बँकेचे पैसे लंपास करून आपल्याच नातेवाईक, कार्यकर्त्यांना वाटले आहेत. बोगस सहकारी साखर कारखाने, संस्था स्थापन करून शेतकऱ्यांच्या नावाने शेकडो कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप सोमय्यांनी केला.