मुंबई - केंद्र सरकारने भाजपाच्या कोणत्या नेत्यावर कारवाई केली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रश्नांवरून भाजप नेते किरीट सोमैया याना छेडले असता, त्यांची पत्रकार परिषदेत गोची झाली. अखेर 18 महिन्यांत ठाकरे आणि पवार यांनी महाराष्ट्रात लूटमार, माफियागिरी केल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्राने भाजपच्या कोणत्या नेत्यांवर कारवाई केली, या प्रश्नांवर सोमैयांनी अखेरपर्यंत चूप्पी साधली.
भाजपा नेते किरीट सोमैयांची प्रतिक्रिया अजित पवारांशी निघडीत असलेल्यांवर गंभीर आरोप -
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू असून जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली आहे. दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाने कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमैयांंनी याप्रकरणाचा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेत, अजित पवार आणि त्यांच्याशी निघडीत असलेल्यांवर गंभीर आरोप केले.
'पवार यांनी जरंडेश्वरचा खरा मालक कोण? हे सांगावे'
मी काल जरंडेश्वर येथे गेलो होतो. अजित पवारही काही दिवसांपूर्वी तिथे जाऊन आले आहेत. त्यामुळे या धाडी कशा संदर्भात सुरु आहेत, हे अजित पवारच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तुम्ही पाप केले आहे, तुम्ही घोटाळे केले आहेत तर कबुल करा. अजित पवारच नव्हे तर देशातील कुठल्याही निर्दोष व्यक्तीला तपास यंत्रणांनी हैराण करु नये, अशी आमची पण भूमिका आहे. परंतु, पवार यांनी जरंडेश्वरचा खरा मालक कोण? हे सांगावे, अशी २७ हजार शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे, असे किरीट सोमैयांनी म्हटले.
सोमैयांकडून सारवासारव -
केंद्रात मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात किरीट सोमैयांना विचारले असता, जनतेने भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी नरेंद्र मोदींना मतदान केले. मोदीजी त्या दिशेने पुढे जात आहेत. तर ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राला भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र करत आहेत, अशी प्रतिक्रिया सोमैयांनी दिली. भाजपच्या कोणत्या नेत्यावर धाडी टाकल्या हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे, असा अजित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर पत्रकारांनी सोमैयांना छेडले असता, १८ महिन्यात महाराष्ट्रात लूटमार, माफियागिरी ठाकरे पवारांनी सुरु केली आहे. अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे घोटाळ्यांसंदर्भात बोलत नाहीत, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच पवार यांनी न्यायालयात दाद मागावी, असा सल्ला देत सारवासारव केली. मात्र केंद्राने भाजपच्या कोणत्या नेत्यांवर कारवाई केली, या प्रश्नावर मौन बाळगला.
हेही वाचा -हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका