मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला अजून एक झटका देण्याची तयारी केली आहे. उद्या (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या अजून एका नव्या मंत्र्यांचा घोटाळा बाहेर आणणार असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला आहे. या आधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या एकूण 11 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यापैकी माजी गृहमंत्री यांची सीबीआयमार्फत कारवाई सुरू आहे. तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस आली आहे. प्रताप सरनाईक यांना देखील ईडीने नोटीस धाडल्या आहेत. त्यामुळे आता नवीन कोणत्या मंत्र्यांवर किरीट सोमय्या उद्या पत्रकार परिषद घेऊन आरोप करणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा -गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार? केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये आज भाजपाची बैठक
राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन मंत्र्यांविरोधात पुरावे असल्याचा दावा -
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांपैकी आता आपल्याकडे दोन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला आहे. यापैकी एक मंत्री शिवसेनेचा तर दुसरा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्याचे किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे. याबाबत आपण भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, सोमवारी त्या दोन मंत्र्यांपैकी एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे समोर आणणार असल्याचे किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा -ठरलं...! लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश
अनिल परब यांचे कार्यालय तोडणार -
परिवहन मंत्री अनिल परब यांचे वांद्रे पूर्व येथे असलेले कार्यालय अनधिकृत आहे. याबाबत आपण लोकायुक्तांकडे तक्रार केली असून, लोकायुक्तांना याची दखल घेत ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कार्यालयावर तोडक कारवाई केली जाईल. लोकायुक्तांसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान हे आदेश लोकायुक्तांनी दिले असल्याचे किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे.