मुंबई- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे पत्र भाजप नेते किरीट सोमैया यांना संजय राऊत यांनी लिहिले होते. मात्र, या पत्रात आपल्या कामाचे कौतुक केल्याबद्दल किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांचे आभार मानले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया हे एकामागून एक आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत किरीट सोमैया यांनी याकडेही लक्ष द्यावे, असे पत्र सोमैया यांना पाठवले होते. या पत्रानंतर किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
'संजय राऊत यांनी माझे कौतुक केले आभारी आहे. भ्रष्टाचार, शासकीय पैशांचा अपहार अशी अनेक प्रकरणे आपण सार्वजनिकरीत्या उघड केली आहेत. हे राष्ट्रावर उपकारच झाले. आपण केलेल्या तपासकार्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांना तुरुंगात जावे लागले, असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या कामांचे कौतुक केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचे आपण आभारी आहोत,' असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. तसेच या प्रकरणात आपण लवकरच संजय राऊत यांना उत्तर देऊ, असेही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.