मुंबई -नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याने भाजप नेते किरीट सोमैया यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली आहे. या घटनेची जबाबदारी आरोग्यमंत्री घेणार आहेत का? असा सवाल सोमैया यांनी उपस्थि केला.
नाशिकच्या झाकीर हॉस्पिटलमध्ये २२ कोवीड रुग्णांचे मृत्यू.. १२ एप्रिलला नालासोपारा येथे ६२ मृत्यू, १० एप्रिल ठाणे येथे २६ रुग्णांचा जीव धोक्यात, १९ एप्रिल मुंबईत १६३ रुग्णांना हलविले या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वीकारणार का? असा सवाल किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे.
घटनेची जबाबदारी आरोग्यमंत्री घेणार का? संबंधित बातमी वाचा-डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती, 61 रुग्णांची प्रकृती गंभीर
नेमके काय घडले?
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात १५० लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोलले जात आहे.
संबंधित बातमी वाचा-नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत
राजेश टोपे काय म्हणाले?
टँकरमधील व्हॉल लीक झाल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे स्थानिक प्रशासनाने कळवले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
दीड तासांनी गळती रोखण्यास यश
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू होते. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
संबंधित बातमी वाचा-ऑक्सिजन गळतीला जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा - प्रवीण दरेकर
दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार-
नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होईल. शिवाय, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.