मुंबई -खार रेल्वे स्टेशन ( Khar Police Station ) बाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज किरीट सोमैया व भाजप शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ( Kirit Somaiya meet Governor Bhagat Singh Koshyari ) यांची राजभवन येथे भेट घेऊन या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की हा हल्ला हा पूर्वनियोजित होता व यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जबाबदार ठरवून त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.
पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी! - राज्यपालांना दिलेल्या निवेदनामध्ये किरीट सोमैया यांनी म्हटले आहे 23 एप्रिल रोजी रात्री १०:२५ च्या सुमारास 70 ते 80 शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. माझ्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये माझ्या गाडीच्या खिडकीच्या काचा फुटल्या. ही बाब मी महाराष्ट्र आणि भारत सरकारचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गृहमंत्रालय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये माझ्यासोबत काही आमदारांनी वारंवार विनंती करूनही पोलिस अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवला नाही, हे फार धक्कादायक आहे. तसेच वांद्रे पोलीस स्टेशन मध्ये माझ्या नावाने बनावट एफआयआर करण्यात आला व हा बनावट एफआयआर प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आला. एफआयआर पूर्णतः बनावट असून त्याची अंतर्गत चौकशी सुरू केली.