मुंबई– भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापौरांवर तात्काळ 24 तासांत कारवाई करा, अन्यथा पालिकेसमोर आंदोलन करू, असा इशारा सोमैया यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गैरकारभार करत भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व एसआरए प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. मात्र पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर कारवाई न झाल्याने त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
किरीट सोमैया म्हणाले की, मुख्यमंत्री कोणतीही कारवाई करत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा महापौरांना पाठिंबा आहे. 24 तासांत तात्काळ कारवाई करा. अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करू, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कुटुंबातत टेंडर देऊन घोटाळा केल्याचा आरोप मनसेने यापूर्वी केला होता. यानंतर गरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेली एसआरएची जागा बळकावून तेथे मुलाची नियमबाह्य कंपनी स्थापन केल्याचा आरोप सोमैया यांनी केला. एकाच पत्त्यावर अनेक बोगस कंपन्या स्थापन करणे, सरकारची फसवणूक करणे आणि पदाचा गैरवापर करून नातेवाइकांना महापालिकेची कंत्राटे मिळवून देणे, असे आरोप किरीट सोमया यांनी महापौरांवर केले होते. आपल्याकडे पुरावे देखील आहेत, असा त्यांनी दावा करून 8 सप्टेंबरला मुख्यमंत्री व एसआरए अधिकार्यांकडे तक्रार केली होती.
काय आहे किरीट सोमैयांचे आरोप?
सोमैय्या यांनी मुख्यमंत्री व एसआरए अधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गरीब झोपडपट्टीवासीयांसाठी राखीव असलेल्या झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाची जागा महापौरांनी अवैधरित्या बळकावली आहे. तसेच महापौरपदाचा गैरवापर करत महापालिका, झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण आणि सरकारी प्राधिकरणांकडून कंत्राट मिळवत आर्थिक लाभ पदरात पाडून घेतले आहेत. तसेच किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे रजिस्टर आहे. ही कंपनी तळमजला, बिल्डिंग क्रमांक १ गोमती जनता एसआरए सोसायटी या पत्त्यावर रजिस्टर आहे. ही जागा कुटुंबीयांच्या मालकीची नसून ते सोसायटीचे वेलफेअर ऑफिस आहे. तसेच या पत्त्यावर आणखी सहा कंपन्या रजिस्टर आहेत. या कंपन्यांनी गेल्या सहा वर्षात आर्थिक व्यवहार तपशील दिलेला नाही. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.